कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या गुणवंतांचा सत्कार सोहळा

Edited by: विनायक गांवस
Published on: June 29, 2025 13:56 PM
views 98  views

सावंतवाडी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२५ मधील कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी सैनिक नागरी पतसंस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर, सिंधुदुर्ग जिल्हा सैनिक स्कूल चे अध्यक्ष तथा सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनिल राऊळ यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात नेहमी मोठी स्वप्ने पाहा. ती साकार करण्यासाठी जिद्द, चिकाटी व निरंतर मेहनत करा. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या प्रगतीसाठी करा."असे मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांच्या व प्रशालेच्या सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी बद्दल अभिनंदन केले. शाळा व संस्थेला आपण नेहमीच सहकार्य करण्याचे जाहीर केले.

यावेळी व्यासपीठावर सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, कलंबिस्त हायस्कूल संस्था सचिव यशवंत राऊळ, संस्था संचालक कॅप्टन सुभाष सावंत, सूर्यकांत राजगे, कलंबिस्त हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष तथा सैनिक पतसंस्था सहव्यवस्थापक प्रल्हाद तावडे, मडुरा हायस्कूलचे माजी शिक्षक प्रताप परब सर,प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव,पालक शिक्षक संघ सदस्या सविता ठाकर आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या  हस्ते कलंबिस्त हायस्कूल मधील एस्.एस्.सी. परीक्षेत प्रशालेत तसेच सांगेली केंद्रामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त- कु.तनिषा संतोष ठाकर (९०%) , प्रशालेत व सांगेली केंद्रात द्वितीय क्रमांक प्राप्त- कु.श्रावणी राजन सावंत(८९.८०%), तृतीय क्रमांक प्राप्त-कु. मानसी दशरथ सावंत(८७.६०%) तसेच इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणारी कु.हर्षा एकनाथ राऊळ व मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणारी कु.मयुरी संतोष देऊलकर या विद्यार्थींनीचा विविध देणगीदारांनी देणगी दिलेल्या रक्कमेतून रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे वार्षिक परीक्षेत इ.५वी ते ९वी तील प्रथम क्रमांकांने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही शाळा व संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी सैनिक नागरी पतसंस्थेचे चेअरमन कविटकर,संस्था संचालक सुभाष सावंत,शिक्षक प्रताप परब सर आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच पालक शिक्षक संघ सदस्या व दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थीनीच्या पालक सविता ठाकर यांनी आपल्या मुलीच्या उज्जवल यशात या प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व विषय शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रती असणारी तळमळ, योग्य नियोजन,वेळोवेळीचे मार्गदर्शन महत्वाचे आहे; यानंतरच्या विद्यार्थ्यांनीही शाळेच्या उत्तुंग यशाची ही परंपरा अशीच कायम राखावी असे सांगत सर्वांचे आभार मानले. गुणवंत विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून यशाचे रहस्य उलगडत शाळेचे आभार मानले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी, सूत्रसंचालन शिक्षक किशोर वालावलकर यांनी, तर आभारप्रदर्शन शिक्षिका विनिता कविटकर यांनी केले. या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.