
सावंतवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. ४ म्हाराठी येथे सोमवारी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व मुलांनी रंगीबेरंगी फेटे परिधान केले होते टाळ वाजवत आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात, गावात प्रवेश रॅली काढण्यात आली. ही रॅली म्हणजे नव्या शालेय जीवनाच्या सुरुवातीचा गजरच होता! पालकांनी या रॅलीत उस्पुर्त सहभाग घेत स्वतः त्यांनी या मुलांचे टाळ वाजवत स्वागत केले. यावेळी विविध घोषणा देऊन शिक्षणाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळचे वेगळेपण म्हणजे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या लहानग्यांचे 'शाळेतील पहिले पाऊल' लक्षात ठेवण्यासाठी पावलांचे ठसे घेण्यात आले. ही एक संस्मरणीय आणि भावनिक क्षणांची नोंद आहे.
शाळेतील सर्वच विद्यार्थ्याना फेटे बांधण्यात आले होते. त्यामुळे नवागतांच्या चेहऱ्यावर उत्साह होता. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व नवागत मुलांना शालेय पुस्तकं आणि गणवेश वाटप करण्यात आले. शिक्षणाचा खरा पाया याच माध्यमातून घातला जातो. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या श्रीमती संजना गावडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती सायली गावडे,आणि मुख्याध्यापक जावेद तांबोळी यांच्यासह पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.