दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला

बाप - लेकीला शॉक ; ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड
Edited by: विनायक गांवस
Published on: June 16, 2025 17:35 PM
views 440  views

सावंतवाडी : मडुरा येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन परबवाडी येथील बाळू गावडे व त्यांच्या मुलीला वीजेचा शॉक लागला. येथील रुपेश परब यांनी प्रसंगावधान राखत वेळीच मेनस्वीच बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. यामुळे सुदैवाने जिवीतहानी टळली. मात्र, अनेक ग्रामस्थांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे  यात जळाली. 

सोमवारी सकाळी मडुरा परबवाडी येथे विद्युत वाहिन्या तुटल्याचे उपसरपंच बाळू गावडे यांनी वीज अधिकाऱ्यांना सांगितले. त्या दरम्यान वीज पुरवठा कमी जास्त होऊ लागला. श्री.गावडे यांनी घरातील मेन स्वीच बंद केली. मात्र अचानक वीज प्रवाह वाढल्याने घरातील खिडक्यांना शॉक येऊ लागला. मीटर जळून आगीचा भडका उडाला. बाळू गावडे यांच्या मुलीला जमिनीवर शॉक लागला. प्रसंगवधान राखून मुख्य स्वीच बंद केल्याने हानी टळली. 

परबवाडीतील अनेक घरांमध्ये ही समस्या उद्भवली आहे. टिव्ही, फ्रिज, फॅन सह अन्य उपकरणे जळाली आहेत. महावितरण अधिकाऱ्यांना या दुर्घटनेची माहिती देण्यात आल्याचे उपसरपंच बाळू गावडे यांनी सांगितले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे ही दुर्घटना झाल्याचा आरोप संतप्त स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, मडुरा पंचक्रोशीतील अनेक विद्युत खांब व वाहिन्या जीर्ण झालेले आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतरच किंवा एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर महावितरणला जाग येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तत्काळ लक्ष देऊन विजेची समस्या सोडविण्याची मागणी मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी केली आहे.