
सावंतवाडी : जिल्हा नियोजनमधून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवागृह दुरुस्ती व शौचालय, स्वच्छतागृह तसेच ड्रेनेज नुतनीकरण यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकामला हे काम तातडीने चालू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेत. गेले दीड वर्ष हा प्रश्न रखडला होता. युवा रक्तदाता संघटना व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यासाठी आरोग्य व बांधकाम प्रशासनाकडे पाठपुरावा करत दीड वर्ष रखडलेला प्रश्न मार्गी लावला आहे.
यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील व वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी शासनाकडे तातडीची मागणी केली. मागील दीड वर्षांपूर्वी यासाठी पाठपुरावा शासन दरबारी करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ते काम रखडले होते. याबाबत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व सामाजिक बांधिलकी चे रवी जाधव यांना रुग्णांचे होणारे हाल समजताच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान त्यांनी ही समस्या मांडली होती. तसेच सार्वजनिक बांधकाम अभियंता महेंद्र किणी व वैभव सगरे यांची युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व पदाधिकाऱ्यांनी भेट घेत आग्रही मागणी केली. यानंतर शासनाकडून या कामासाठी निधी मंजूर करत सार्वजनिक बांधकाम विभागाला पावसापूर्वी काम करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून दिले त्यानंतर संपूर्ण काम पुर्णत्वास येत आहे.त्यामुळे युवा रक्तदाता संघटना व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर,पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांचे आभार दोन्ही संघटनांकडून मानण्यात आले आहे.