विद्युत भारित लाईन पडल्याने गाय गतप्राण

Edited by: विनायक गांवस
Published on: June 06, 2025 19:31 PM
views 176  views

सावंतवाडी : विद्युत भारित लाईन तुटून अंगावर पडल्याने मळगाव रेडकरवाडी येथे सेहवाल जातीची गाय जागीच गतप्राण झाल्याचा प्रकार शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये शेतकरी गोपाळ सदाशिव सातार्डेकर यांचे सत्तर हजार रुपयाचे नुकसान झाले. घटनेनंतर त्वरित वीज वितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

शेतकरी गोपाळ सातार्डेकर हे संध्याकाळी तीन गाईंना नजीकच्या शेतात चारण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी त्या भागातून गेलेली इलेव्हन  केव्हीची लाईन तुटून खालून गेलेल्या एलटी लाईनवर पडली. तेथे चरत असलेल्या गाईच्या अंगाला तीचा स्पर्श झाला. एलटी लाईनचा विद्युत प्रवाह त्या लाईनमधून पास झाल्याने गाईचा मालकाच्या डोळ्यादेखत तडफडून मृत्यू झाला. सुदैवाने सातार्डेकर व अन्य दोन गायी लांब असल्याने मोठा अनर्थ टळला. श्री सातार्डेकर यांनी अलीकडेच शासकीय योजनेतून सहीवाल जातीच्या तीन गाई दुग्ध व्यवसायासाठी घेतल्या होत्या.

तब्बल ७० हजार रुपयाची एक गाय असून आज झालेल्या घटनेत त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. घटना घडताच प्रसंगवधान दाखवत श्री. सातार्डेकर यांनी त्वरित याची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी सरपंच हनुमंत पेडणेकर यांना कल्पना दिल्यानंतर वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधत तात्काळ विद्युत पुरवठा खंडित करण्यास सांगितले. घटनास्थळी वीज वितरणचे उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे व अन्य कर्मचारी वर्ग दाखल झाले. शिवाय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाही त्या ठिकाणी बोलावून रीतसर पंचनामा करण्यात आला. झालेल्या प्रकाराबाबत ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली. तर वीज वितरणच्या कारभाराबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. वीज वितरणने याबाबतची जबाबदारी स्वीकारत संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई त्वरित मिळवून द्यावी अशी मागणी यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून करण्यात आली.