
सावंतवाडी : कुडाळ तुळसूली येथील अत्यंत गरीब कुटुंबातील चिमुकला दुर्धर आजारामुळे त्रस्त होता. मुंबई येथील एका हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी तब्बल ९० हजारांची आवश्यकता असताना सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दानशूर व्यक्तींनी १ लाख ८ हजारांची मदत केली. त्यामुळे या चिमुकल्याच्या डोक्याची शस्त्रक्रिया होणार असून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी दानशुर व्यक्तींचे आभार मानले आहेत.
चिमुकल्याच्या पालकांनी दानशूर व्यक्तींचे ऋण व्यक्त केले आहेत. शस्त्रक्रियेसाठी 90 हजार रुपयांची आवश्यकता होती. यासाठी लागणारा पाईप मुंबईत वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे बाहेरून मागवण्यात आला. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व दानशुरांच्या मदतीमुळे हे शक्य झाले. दोन दिवसातच दानशुरांनी तब्बल एक लाख आठ हजार रुपये इतकी रक्कम संबंधित मुलाच्या खात्यामध्ये जमा केली. चिमुकल्याचा ताप कमी झाल्यावर लगेचच शस्त्रक्रिया करणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. दानशूरांच्या मदतीमुळे चिमुकल्याला व त्यांच्या कुटुंबीयांना मोठी मदत झाली आहे.