
सावंतवाडी : एसटी बस स्थानकावर गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. आतापर्यंत स्थानिक आमदार मंत्री केसरकर यांनी घोषण केल्या. मात्र, प्रत्यक्ष सोयी सुविधा कधीच दिल्या नाहीत. प्रवाशांच्या होणाऱ्या या प्रचंड गैरसोयी व नाराजीबद्दल सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी उद्या १८ रोजी घंटानाद आंदोलन छेडणार आहेत. हे आंदोलन सर्वसामान्य जनतेच्या हिताचे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलनाला उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन तालुकाप्रमुख पुंडलिक दळवी व शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर यांनी केले आहे.
दरम्यान, याला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पाठिंबा असून सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केले. सावंतवाडी एसटी बस स्थानकावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सात वर्षां पूर्वी बस स्थानकाचे भूमिपूजन झाले होते तरीसुद्धा प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. बस स्थानकावर चिखल, खड्डे, ठिकठिकाणी पाणी, उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य, बैठक व्यवस्थेवर ठिपकणारे पाणी असल्यामुळे प्रवाशांना साधं बसताही येत नाही अशी परिस्थिती बस स्थानकाची झाली आहे असं मत रूपेश राऊळ यांनी व्यक्त केले