
सावंतवाडी : सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस शिशु विहार, सावंतवाडी येथे बालवाडी, शिशु गटातील 2ते 6 वयोगटातील मुलामुलींनी ज्योतिबा फुले आणि सावत्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. या कार्यक्रमात महाराष्ट्र पोलीस दल रेजिंग डे निमित्त सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि महिला अंमलदार उपस्थित होते.
कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिशु विहारच्या अध्यक्षा आणि संस्थापक डॉ. सोनल लेले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी मुला मुलींनी गणेश स्तोत्र, मारुती स्तोत्र, जय शारदे माता गीत, बडबडगीते, देश भक्तीपर गीत हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या, अशी गीते सादर केली. अतिशय सुंदर वेशभूषा आणि सुंदर आवाजात गायलेली गीते यामुळे कार्यक्रम उत्साहवर्धक झाला. यावेळी सावंतवाडीचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, आनंद यशवंते, महिला पोलीस हवालदार मागदेलिन अल्मेडा, स्वरा वरक, पोलीस कॉन्स्टेबल गौरी ताम्हाणेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लहान मुलांमध्ये देशाबद्दल भावना वाढीस लागावी, त्यांच्या सुरक्षिततेबाबत ११२ प्रणालीची ओळख यावेळी करण्यात आली. प्रणालीची ओळख यावेळी करण्यात आली . या कार्यक्रमाचे आयोजन शिशु विहारातील शिक्षिका उर्मिला राणे, प्रांजळ तिलवे, मदतनीस प्रतिभा गवळी यांच्या सहकार्याने उत्कृष्टरित्या करण्यात आले होते. पोलीस आणि विद्यार्थी यांच्यात झालेला हा कार्यक्रम अगदी अविस्मरणीय ठरला. आभार डॉ. सोनल लेले यांनी मानले.