
कणकवली : उपजिल्हा रुग्णालयातील बिघडलेली आरोग्य व्यवस्था सुधारा, अन्यथा १५ ऑगस्टला रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा सत्यशोधक सेक्युलर फ्रंटचे नेते अॅड. सुदीप कांबळे यांनी जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना निवेदनाद्वारे दिला होता. त्याची दखल घेत जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष इंगळे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांच्या दालनात काही दिवसांपूर्वी चर्चेसाठी बोलवले होते. या चर्चेत सुंदीप कांबळे यांनी त्यांच्यासमोर रुग्णालयातील समस्यांचा पाढा वाचला होता, १५ आॅगस्टपूर्वी समस्या मार्गी न लागल्यास उपजिल्हा रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. अखेर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी पत्र दिले. सदर लेखी पत्र संदीप कांबळे यांना उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी सुपूर्द केले. यात बहुतांश मागण्यांची पूर्तता झाल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे सुदीप कांबळे यांच्या आंदोलन इशाऱ्याला यश आले आहे.
हाडांच्या रुग्णांसाठी २४ तास अस्थिरोग तज्ज्ञ उपलब्ध आहेत. शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्री देण्यात आली आहे. रुग्णालयात पदभरती झालेले डॉक्टर २४ तास सेवेत असून वैद्यकीय अधिकाºयांचा आठ तासाच्या डयुटीनुसार ते सेवेत कार्यरत असतात. तसेच रजेवर असलेले सर्व डॉक्टर रुग्णसेवेत कार्यरत आहे. सिटी स्कॅन मशीन सुरू झाले असून त्याची २४ तास सेवा उपलब्ध आहे. आतापर्यंत १३५ रुग्णांनी त्याचा मोफत लाभ घेतलेला आहे. रुग्णालयाला पूर्णवेळ रेडिओलॉजिस्ट उपलब्ध होईपर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून ११ आॅगस्टपासून आठवडयातून सोमवार व गुरुवार या दिवशी डॉ. रुपेश जाधव हे रेडिओलॉजिस्ट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. रुग्णालयात रक्तसाठा केंद्र असून दररोज रक्तसाठा केंद्राबाहेर उपलब्ध असल्याचा फलक लावण्यात आला आहे. रुग्णालयीन व्हॉट्सअॅप ग्रुपवर दररोज रक्तसाठ्याची माहिती अपडेट केली जाते. काही तांत्रिक कारणास्तव लिफ्ट बंद होती, ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही सुरू आहे. स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून सुप्रिया देशमुख यांना नियुक्ती देण्यात आली आहे. कंत्राटी तत्त्वावर काम करणाºया मुस्कान खान व दीप्ती पवार यांना पुन्हा कामावर घेण्याबाबत कंत्राटदारांना पत्र व्यवहार करण्यात आला आहे. रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर काम करणाºया कर्मचाºयांना शासनाच्या किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा करण्याबाबत संंबंधित कंत्राटदारांना सूचना करण्यात आलेल्या आहे. बाल रुग्णांसाठी कक्ष क्रमांक १५ मध्ये स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे. तर अन्य मागण्याची पूर्तता लवकरच होईल, असे लेखी पत्रात म्हटले आहे.
कांबळे यांच्या काही मागण्या मान्य झाल्याचे पत्र त्यांना डॉ. रेड्डी यांनी सुपूर्त केले. यावेळी डॉ. अक्षय पाटील, अमित कासले, मुस्कान खान, दीप्ती पवार आधी उपस्थित होते.