....तर ठाकरे गट तीव्र आंदोलन छेडणार : सतीश सावंत

Edited by: विनायक गावस
Published on: November 16, 2023 19:36 PM
views 408  views

सिंधुदुर्ग : रिलायन्स इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यास सुरुवात झाली असली तरी अद्यापही जिल्ह्यातील अनेक शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. तरी २३ नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नसेल तर शिवसेना (उ बा ठा) तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अशी माहिती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.


जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह मायकल डिसोजा, आनंद ठाकूर, संतोष परब यांनी आज जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालय भेट देत रिलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधी सिद्धेश एडगे यांच्याशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत चर्चा केली. तसेच रिलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी प्रमोद पाटील यांच्याशी दूरध्वनी द्वारे चर्चा करून जिल्ह्यात अद्यापही शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळालेला नाही याबाबत जाब विचारला. यावेळी त्यांनी २३ नोव्हेंबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांना विम्याचा लाभ दिला जाईल असे आश्वासन दिले आहे.असे सांगितले. मात्र जिल्ह्यातील एकूण ५७ महसूल मंडळापैकी १८ महसूल मंडळातील एकही शेतकऱ्यांना लाभ मिळालेल्या नाही. तर उर्वरित ३९ महसूल मंडळातील काही शेतकरी अद्यापही विम्याच्या रकमेपासून वंचित आहे .याकडे त्यांचे लक्ष वेधले असल्याची माहिती सतीश सावंत यांनी दिली.


जिल्ह्यातील  ३७ हजार शेतकऱ्यांनी ८ कोटीहून अधिक विमा रक्कम विमा कंपनीकडे भरणा केली आहे. त्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणे आवश्यक होते .मात्र विमा कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक शेतकरी अद्यापही विमा रकमेपासून वंचित राहिले आहेत .


जिल्ह्यात बसविण्यात आलेल्या ५७ हवामान माफक केंद्रापैकी ३९ केंद्रे कार्यान्वित आहेत त्यापैकी ९ केंद्र सदोष आहेत .यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तरी याबाबत आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कृषिमंत्री यांची लवकरच भेट घेतली जाणार आहे .असेही यावेळी सतीश सावंत यांनी सांगितले. जिल्ह्यात ५७ हवामान मापक केंद्रे स्थापन करण्यात आलेली असली तरी त्यापैकी फणसगाव ,तळवडे, कसई, कोणाळ, उमरट, कळसुली, खारेपाटण, मळगाव, ओरोस बुद्रुक, झाराप, कोळब, सुकळवाड, इन्सुलि, माडखोल ,मातोड़, कुसूर या ठिकाणी अद्याप हवामान यंत्रे बसविलेली नाहीत. त्यामुळे या मंडळातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यांना विम्याची रक्कम मिळत नाही याकडे कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार आहेत. तसेच बंद असलेली सर्व हवामान मापक केंद्र तात्काळ सुरू करावी. प्रत्येक गावात हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात यावे. अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे .जिल्ह्यात कार्यान्वित असलेल्या हवामान मापक केंद्रापासून अनेक गावे दूर असल्याने त्या ठिकाणी पडलेला पाऊस आणि तापमान याची योग्य नोंद होत नाही. त्यामुळे अशा गावातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही, त्यांना विम्याचा लाभ दिला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. तरी यापुढे कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी पालकमंत्र्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून द्यावा अन्यथा शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आणि विमा कंपनीचा अनागोंदी कारभाराला लगाम लावण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करावे लागेल. असा इशारा सतीश सावंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला.