ठाकरे शिवसेना स्वबळावर लढणार : सतीश सावंत

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 11, 2025 19:33 PM
views 17  views

वैभववाडी : विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचं आम्ही चिंतन करीत आहोत. एका दोघांच्या जाण्याने पक्ष संपत नाही.सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी अन्य पक्षात प्रवेश केला असला तरी, कार्यकर्ते व शिवसैनिक पक्षाशी एकनिष्ठ आहेत.त्यांच्या साथीने पुन्हा पक्ष संघटना मजबूत बांधली जाईल. येणा-या निवडणूकाही  स्वबळावर लढणार असं कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी सांगितले.

   विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर वैभववाडी ठाकरे शिवसेनेची तालुका कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांनी श्री.सावंत यांना पुढील निवडणुका महाविकास आघाडीकमधून लढणार का असा प्रश्न विचारला असता, श्री सावंत म्हणाले जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे शिवसेना स्वबळावर लढणार आहे. पक्षप्रमुखांचे जे आदेश असतील ते आम्ही पाळणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

तसेच ते म्हणाले, तालुक्यातील संघटनेत फेरबदल केले जाणार आहेत. संघटनेत तरुणांना संधी दिली जाणार आहे. या सर्वांच्या माध्यमातून पुन्हा पक्ष संघटना मजबूत केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.