
कणकवली : कणकवली मधील सामंत इलेक्ट्रॉनिक्स चे मालक व कणकवली शहरातील रहिवासी सतीश कल्याण सामंत (53) यांचे शुक्रवारी दुपारी मुबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांचा नरडवे रोड वर हरकुळ बु. येथे अपघात झाला होता. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मणिपाल रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर काही दिवस ते कणकवली येथील आपल्या घरी होते. मणिपाल रुग्णालयात त्यांच्यावर डोक्याच्या मोठ्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या होत्या.
मात्र त्यांची प्रकृती साथ देत नसल्याने काही दिवसांपूर्वीच उपचारासाठी मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. या उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. सामंत इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराघरांमध्ये त्यांच्या दुकानाचे नाव पोचले होते.. अत्यंत मेहनत घेत त्यांनी आपला व्यवसाय मोठा केला होता. मनमिळावू स्वभाव यामुळे अनेकांची त्यांचे स्नेहाचे संबंध होते. प्रत्येक येणाऱ्या ग्राहकाला वस्तू घेतल्यानंतर पैशाचे काय ते बघूया तुम्ही वस्तू चॉईस करा असं त्यांचं वाक्य असायचं त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी सगळ्यांची मन जिंकली होती. गेले अनेक वर्ष कणकवलीत करंबेळकरवाडी येथे ते स्थायिक झाले होते. सुरुवातीच्या काळात बाजारपेठेत महापुरुष कॉम्प्लेक्स मध्ये सामंत इलेक्ट्रॉनिक्स या दुकाना च्या माध्यमातून त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. व त्यानंतर व्यवसाय विस्तारीकरण करत असतानाच गागो मंदिर समोर असलेल्या सामंत इलेक्ट्रॉनिक या इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीच्या दुकानाच्या माध्यमातून त्यांनी आपला व्यवसाय विस्तारित केला होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे. कणकवली तालुक्यातील ओटव न 1 मधील प्राथमिक शिक्षिका स्नेहा सामंत यांचे ते पती होते.