सावंतवाडीत सरपंच आरक्षण जाहीर

६३ ग्रा.पं. सरपंचपदासाठी सोडत ; काहींचे पत्ते कट
Edited by: विनायक गांवस
Published on: July 15, 2025 14:51 PM
views 145  views

सावंतवाडी : तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आज मंगळवारी  तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली. या आरक्षण सोडतीत तालुक्यात अनुसूचित जातीसाठी एकुण ४ जागा आरक्षित झाल्या असून त्यातील २ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी कोणतीही जागा आरक्षित नाही. तर इतर मागास प्रवर्गासाठी १७ जागा आरक्षित असून त्यातील ८ महिला तर ९ जागा सर्वसाधारणसाठी राखीव आहेत. तसेच सर्वसाधारण आरक्षणामध्ये ४२ जागा असून त्यात २१ महिला व २१ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्यात.

येथील बॅ. नाथ पै सभागृहात कळसूलकर प्राथमिक शाळेची दुसरीतील विद्यार्थिनी आरोही अमित अरवारी या लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढत सोडत जाहीर करण्यात आली. याप्रसंगी तहसिलदार श्रीधर पाटील, नायब तहसीलदार लता वाडकर, महसुल सहाय्यक रामचंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायतनिहाय जाहिर झालेल्या आरक्षणानुसार एकूण ३२ सरपंचपदे विविध प्रवर्गांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत. यामध्ये, अनुसूचित जातीसाठी एकूण ४ जागा आरक्षित झाल्या असून त्यातील दोन महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यात सोनुर्ली व कलंबिस्त या महिलांसाठी तर कुणकेरी व तिरोडा या ग्रामपंचायती अनुसुचित जाती खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी कोणतीही जागा आरक्षित नाही. तर इतर मागास प्रवर्गासाठी एकूण १७  जागा निश्चित करण्यात आल्या असून यापैकी ८ जागा महिलांसाठी राखीव तर ९ जागा खुल्या आहेत. खुल्या प्रवर्गात आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये माजगाव, मळगाव, सातार्डा, दांडेली, धाकोरे, असनिये, केसरी - फणसवडे, रोणापाल आणि पडवे माजगाव यांचा समावेश आहे. तर इतर मागासवर्ग महिलांसाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये चौकुळ, न्हावेली, कास, निगुडे, आंबेगाव, कवठणी, वेत्ये, सरमळे यांचा समावेश आह आहे. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ जागा आरक्षित असून खुल्या २१ व २१ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी आरक्षित झालेल्या प ग्रामपंचायतींमध्ये कोलगांव, इन्सुली, आंबोली, मळेवाड, सांगेली, ओटवणे, शिरशिंगे, मडुरा, तळवणे, डिंगणे, डेगवे, वाफोली, विलवडे, देवसू - दाणोली, भालावल, ओवळीये, गुळदुवे, पारपोली, किनळे, आरोस व गेळे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

तर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात बांदा, तळवडे, आरोंदा, कारीवडे, माडखोल, नेमळे, चराठे, निरवडे, आजगाव, शेर्ले, ताबोंळी, वेर्ले, सातूळी -बावळाट, भोमवाडी, सावरवाड, सातोसे, नेतर्डे, पाडलोस, साटेली तर्फ सातार्डा, कोनशी - दाभिळ व आणि नाणोस या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यावळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, माजी सरपंच दत्ताराम उर्फ नाना पेडणेकर, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच गणेश प्रसाद पेडणेकर, निलेश कुडव, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, कोलगाव उपसरपंच दिनेश सारंग, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, माजी सरपंच सुनील गावडे, माडखोलचे माजी सरपंच संजय शिरसाट, तळवडेचे ग्रामपंचायत सदस्य दादा परब, 

यांसह विविध गावचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. या आरक्षण सोडतीमुळे अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना धक्का बसला. काहींना अनपेक्षित संधी चालून आली. गावागावांमध्ये या आरक्षणामुळे नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाली असून सरपंचपदासाठी इच्छूक असलेल्यांनी आता आपल्या पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दोन महिन्यांपूर्वी सावंतवाडी तालुक्यातील सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र, न्यायालयीन निर्णयामुळे ती आरक्षण सोडत रद्द करीत नव्याने आरक्षण काढण्यात आले. यात मागील वेळी काढण्यात आलेल्या आरक्षणावेळी कोलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्ग खुल्या गटासाठी आरक्षित झाले होते. मात्र, यावेळी त्या ठिकाणी आरक्षणात बदल होऊन तिथे इतर मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी इच्छुक असलेल्या काहीजणांचा हिरमोड झाल्याचे पहावयास मिळाले.