'एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदे'च्या 'महाराष्ट्र राज्य कोकण विभाग अध्यक्ष' पदी संतोष राणे

केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते संतोष राणे यांचा सन्मान
Edited by: संदीप देसाई
Published on: November 27, 2022 11:10 AM
views 380  views

सिंधुदुर्ग : 'एमआयटी, पुणे' शिक्षण संस्थासमुहाच्या 'एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट' अंतर्गत 'एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसदे'ची स्थापना करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळचे बांबुशेती आणि बांबुउदयोगतज्ञ व सामाजिक कार्यकर्ते संतोष राणे यांची या सरपंच संसदेचे 'महाराष्ट्र राज्य - कोकण विभाग अध्यक्ष' या पदावर सन्मानपूर्वक नियुक्ती करण्यात आली.


'राष्ट्रीय सरपंच संसदे'च्या महाराष्ट्र राज्यातील पदाधिका-यांचे दोन दिवसीय अधिवेशन व नियक्तीपत्र आणि ओळखपत्र वितरण कार्यकम एमआयटीच्या 'श्रीसंत ज्ञानेश्वर सभागृहात १८ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. केंद्राच्या 'आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या राज्यमंत्री डॉ. भारती पवार ह्या उदघाटक व प्रमुख अतिथी होत्या. 'एमआयटी, पुणे' शिक्षणसंस्थासमुहाचे कार्यकारी अध्यक्ष, 'एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट' चे प्रणेते राहुल कराड अध्यक्षस्थानी होते. डॉ. भारती पवार यांच्या हस्ते संतोष राणे यांना नियक्तीपत्र आणि ओळखपत्र देवून ही नियुक्ती सन्मानपूर्वक घोषीत करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे 'वन' विभागाचे मंत्री व ज्येष्ठ नेते  सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आभासी पध्दतीने मार्गदर्शन केले.


प्रमुख संयोजक व सरपंच संसदेचे राष्ट्रीय समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वयक प्रकाशराव महाले, राज्य कार्यवाह व्यंकटेश जोशी, राज्य संघटक डॉ. नामदेव गुंजाळ, ग्रामविकासतज्ञ समिती समन्वयक बाजीराव खैरनार, जिल्हा परिषद महिला सदस्य समिती समन्वयक सौ. सरिता गाखरे व 'एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट' चे संचालक डॉ. गिरीसन हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.


'अभिनव फार्मर्स क्लब' चे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके, 'जेएसडब्ल्यु स्टील कंपनी'च्या सी. एस. आर. विभागाचे प्रमुखअनिल दधीच व एमआयटीच्या रूरल इमर्शन प्रोगामच्या समन्वयक डॉ. निलम पंडीत यांनी या अधिवेशनात पदाधिका-यांना मार्गदर्शन केले.


देशाच्या पंचायतराज व्यवस्थेतील सर्व लोकप्रतिनिधींचे अराजकीय स्वरूपात संघटन करणे, त्यांचे सर्वांगीण प्रबोधन करणे आणि त्यांना ग्रामविकासाची प्रक्रिया यशस्वीपणे राबवता यावी यासाठी सहाय्यभूत होतील असे विविध उपकम अभ्यासपूर्वक राबवणे हे 'एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसदे'चे प्रमुख उदिदष्ट आहे. 'एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसदे'चे विविध उपकम महाराष्ट्र राज्याच्या ३४ ग्रामीण व ०२ शहरी जिल्हयात यशस्वीपणे राबवता यावेत यासाठी या एकुण ३६ जिल्हयातून सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान असणा-या सहका-यांचे मोठे नेटवर्क संघटित करण्यात आले आहे. निवड करण्यात आलेल्या सहका-यांना या अधिवेशनात प्रमुख अतिथींच्या हस्ते नियुक्तीपत्र व ओळखपत्र वितरीत करण्यात आली.


'एमआयटी - राष्ट्रीय सरपंच संसदे'चे कोकण विभागाचे समन्वयक सुहास सातार्डेकर, महिला समन्वयक सौ. वंदनाताई दराडे, महिला संघटक सौ. मंगलाताई बडे, पुणे विभागाचे अध्यक्ष रविंद्र पाटील, समन्वयक  प्रा. सुहास पाटील, महिला समन्वयक श्रीमती भक्ती जाधव, महिला संघटक डॉ. वैशालीताई शिंदे, नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय भांबर, समन्वयक सुनिल दराडे, महिला समन्वयक सौ . रोहीणीताई . नायडू महिला संघटक आर्कि. अमृता पवार, औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष  भाऊसाहेब घुगे, समन्वयक गोपाळराव ईजळीकर, महिला समन्वयक सौ. सुमन भांगे, महिला संघटक सौ. इंदुमती आघाव, नागपूर विभागाचे अध्यक्ष विनय दाणी, समन्वयक संजय गजपूरे, महिला समन्वयक सौ. अनिता दियेवार, महिला संघटक सौ भावनाताई चाम्भारे, अमरावती विभागाचे अध्यक्ष अभय खेडकर, समन्वयक  अमोल ढोणे, महिला समन्वयक प्रा. वर्षा निकम, महिला संघटक श्रीमती मंदाकिनी पाटील, पुणे जिल्हा महिला समन्वयक श्रीमती भावना थोरात यांसह महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्हयातील पुरुष व महिला शाखेचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा समन्वयक, जिल्हा संघटक, जिल्हा सहसमन्वयक, जिल्हा सहसंघटक, महानगर व नगर समन्वयक तसेच पुणे जिल्हयातील सर्व तालुक्यांच्या सर्व महिला पदाधिकारी या अधिवेशनासाठी होत्या.

सरपंच संसदेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष विष्णु मोंडकर, समन्वयक प्रेमानंद देसाई व संघटक व्यंकटेश भंडारी यांनी या नियुक्तीबददल संतोष राणे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.