
मंडणगड : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागामार्फत संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ. विष्णु जायभाये, डॉ. धनपाल कांबळे, डॉ. संगीता घाडगे, डॉ. सूरज बुलाखे, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी समन्वयक डॉ. विष्णु जायभाये यांनी उपस्थितांचे स्वागत करुन संत गाडगेबाबा यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य डॉ. राहुल जाधव म्हणाले, गाडगेबाबा हे एक वैज्ञानिक दृष्टिकोन लाभलेले प्रसिध्द समाजसुधारक होते. दीन-दलित आणि पीडितांच्या सेवेसाठी तसेच समाजातील अज्ञान, अंधश्रध्दा, भोळ्या समजुती, अनिष्ट रुढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. ते गावोगावी जाऊन कीर्तन-प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजाला जागृत केले. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवणही दिली. म्हणून आजही त्यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत आहे. आपण सर्वांनी त्यांच्या कार्याचा आदर्श आपल्या डोळयासमोर ठेवावा असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. शेवटी कार्यक्रमाचे आभार डॉ. विष्णु जायभाये यांनी मानले.