
वेंगुर्ले : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका पुढील काळात कधीही लागू शकतात. यासाठी आपली स्वतःची ताकद आपण स्वतः निर्माण केली पाहिजे. यासाठी तालुक्यात विभाग निहाय दौरा व शहरात प्रभाग निहाय दौरा लावा. प्रभाग निहाय दौरा लावा. प्रत्येक विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्याशी मी स्वतः संवाद साधणार आहे. त्यांच्या भावना जाणुन घेणार. संघटना मजबूत करण्यासाठी यापुढे कोणतीही तडजोड नाही. अशा सक्त सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी वेंगुर्ले येथे बोलताना पदाधिकारी कार्यकर्त्यांना केल्या.
वेंगुर्ले तालुका शिवसेना पक्षाची मासिक सभा आज १२ एप्रिल सप्तसागर येथील तालुका कार्यालयात संपन्न झाली यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब बोलत होते. यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, महिला तालुकाप्रमुख दिशा शेटकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, महिला उपजिल्हाप्रमुख शीतल साळगावलर, कोचरा सरपंच योगेश तेली, महिला शहर प्रमुख श्रद्धा परब- बाविस्कर, तालुका संघटक बाळा दळवी, युवासेना शहरप्रमुख सागर गावडे, विभाग प्रमुख दत्ता साळगावलर, पूजा सोनसुरकर, योगिता कडुलकर - धुरी, संतोष परब यांच्यासहित तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन वालावलकर म्हणाले, शिंदे साहेब यांच्याकडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या प्रत्येक अडचणी पोचत असतात. महायुतीत अनेक निर्णय लोकहिताचे या सरकारने घेतले. शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी आपण सर्वांनी सुद्धा पुढे येणे गरजेचे आहे. आपण लोकांपर्यंत पोचणे गरजेचे आहे. 2 महिन्यापूर्वी आम्ही निर्णय घेऊन सभासद नोंदणीचे अभियान हाती घेतले. पुढील काळात वेंगुर्ले तालुक्यात शिवसेना पक्ष १ नंबरचा पक्ष होईल होण्यासाठी प्रयत्न करूया असेही वालावलकर म्हणाले.
तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी आगामी काळात तालुक्यात पक्षामार्फत राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच तालुक्यात सुमारे ७ हजार सदस्य नोंदणी कडे पक्षाची वाटचाल असल्याचे सांगितले. शहरप्रमुख उमेश येरम यांनी शहरातील सभासद नोंदणी प्रभावीपणे राबवण्यात आली आहे. प्रत्येक घरोघरी जाऊन नोंदणी करण्यात आली असल्याचे संगीतले. युवासेना उपजिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी आभार मानले.