मंत्री केसरकर, महायुतीच्या कार्यकर्त्यांचे संजू परब यांनी मानले आभार

Edited by: विनायक गांवस
Published on: May 06, 2024 09:57 AM
views 95  views

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घेतलेली मेहनत पहाता ६० ते ७० हजारांचं मताधिक्य महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सावंतवाडी मतदारसंघातून मिळणार असा विश्वास भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला. तर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून बोलायला मुद्दे शिल्लक न राहिल्याने ते काहीही बरळत आहेत. सावंतवाडी मतदारसंघात विरोधक २५ टक्के मत सुद्धा घेऊ शकत नाहीत असा टोला त्यांनी 'उबाठा' शिवसेनेला लगावला. 

ते म्हणाले, लोकसभेच मतदान उद्या होत आहे. तालुक्यातील सर्वच महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली ंआहे.‌ त्यामुळे किमान अडीच लाखांच मताधिक्य महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मिळेल, सावंतवाडी मतदारसंघात ६० ते ७० हजारांच मताधिक्य नारायण राणे यांना मिळेल असा विश्वास भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी व्यक्त केला. भाजपसह नारायण राणे यांच्यावर जनतेच असलेलं प्रेम पहाता महायुतीचा विजय निश्चित आहे. नारायण राणे, रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या विकासाच्या जोरावर आम्ही प्रचार केला आहे.

अनेक विकासकामे शहरात देखील झाली आहेत. त्यामुळे शहरात देखील आम्ही ८० टक्के मत घेऊ. दरम्यान, कालच्या सभेला भर उन्हात अडीच हजार लोक सभेला होते‌. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना मुद्दे शिल्लक न राहिल्याने ते बरळत आहेत. विरोधक मतदारसंघात २५ टक्के मत सुद्धा घेऊ शकत नाहीत. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आमचा विजय निश्चित आहे. ४ जूनला नारायण राणे यांची विजयी रॅली आम्ही काढू असा विश्वास व्यक्त करत प्रचारासाठी मेहनत घेणाऱ्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि रासपच्या कार्यकर्त्यांचे आभार संजू परब यांनी मानले.

ते म्हणाले, कालची सभा भर उन्हात होती. शनिवारच्या सभेपेक्षा अधिक गर्दी आमच्या सभेला होती. तर राज ठाकरेंच्या सभेला झालेली गर्दी ही सावंतवाडीत झालेल्या उबाठाच्या सभेपेक्षा दहापट गर्दी होती. भर उन्हात सभा घेण साधी गोष्ट नाही. या मतदारसंघातून आम्ही निश्चित लीड घेऊ असा विश्वास व्यक्त केला. तर दीपक केसरकर यांनी चांगल्या पद्धतीने यंत्रणा हाताळली. सर्वांना एकत्र आणत वाद मिटवून प्रचार केला. त्यामुळे दीपक केसरकर यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो  अस मत संजू परब यांनी व्यक्त केले.

दरम्यान, देशभरात भाजपच्या तंबूची काठी भक्कम आहे. ती काठी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. परंतू, इंडिया आघाडीकडे तंबूची काठीच नाही आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार त्यांच्याकडे नाही. विश्वगुरू पंतप्रधान उद्धव ठाकरे होणार अस सांगतात. इंडिया आघाडीला मधली काठीच नाही आहे‌. २१ जागा लढवणारे पंतप्रधान होण्याची स्वप्न पहात आहेत. महायुतीचे पंतप्रधान निश्चित आहेत. ४०० पार करताना नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. ज्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही, विकासाचे मुद्दे नाहीत अशांना लोक भुलणार नाही. एका बाजूने विकास तर दुसरीकडे फक्त शिवीगाळ हे पहता कोकणी जनता नारायण राणे यांना विजयी करेल असा विश्वास माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक यांनी व्यक्त केला. याप्रसंगी भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब, माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक, माजी नगरसेवक उदय नाईक, मंदार नार्वेकर आदी उपस्थित होते.