ख्रिश्चन बांधवांचा ‘सांजाव” उत्साहात..!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 24, 2023 18:41 PM
views 268  views

सावंतवाडी : मान्सूनच्या सुरुवातीला साजरा होणारा ख्रिश्चन बांधवांचा उत्साहाचा सण म्हणजे ‘सांजाव” ख्रिश्चन बांधवांचा हा  सांजाव बांदा- इन्सुली येथील होली क्रॉस चर्च येथे शनिवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव आणि युवा युवाई सहभागी झाली होती. सकाळपासून पावसानं देखिल जोर धरल्याने सांजाव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

संत जॉन बाप्तिस्ता यांचा जन्मदिवस सांजाव म्हणून साजरा केला जातो. संत जॉन यांच्या नावाचा अपभ्रंश होऊन ‘सांजाव' शब्द बनला आहे. हा सांजाव सण गोव्यासह कोकणात  देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक सांजाव उत्सवाची धूम या निमित्ताने पाहायला मिळाली.

बायबलमधील कथेनुसार जीजसच्या जन्माची बातमी ऐकल्यानंतर आपल्या आईच्या पोटात असलेल्या जॉन बाप्तिस्त यांनी आनंदाने उडी मारली होती.

जॉ बायबलच्या कहाणी नुसार देवाची आई 'मेरी'ने आपली बहीण एलिजाबेथला आपल्याला जीजस नावाचा बाळ होणार असल्याचे सांगितले. तेव्हा एलिजाबेथ गर्भवती होती आणि ते ऐकल्यावर तिच्या पोटातील बाप्तिस्त त्यांनी आनंदाने उडी मारली होती. तेव्हापासून हा सण साजरा केला जात असल्याचे बोलले जाते. ख्रिस्ती लोक विहिरीला एलिझाबेथच्या गर्भाशयाचे प्रतीक मानत असून विहिरीत उडी मारणे म्हणजे ख्रिस्ताचा जन्माचा आनंद साजरा करण्यासारखे मानतात. शनिवारी धो-धो पडणाऱ्या पावसामध्ये डोक्यावर रंगीत फुलांचे मुकुट घालून अर्थात कॉपेल हातामध्ये माडाच्या झाडाच्या फांद्या आणि वाद्यांचा गजर करीत ख्रिस्ती बांधव हा सण साजरा करतात.

मौज मस्ती करत कोकणी गाणी गात, घुमट वाद्य वाजवत सर्वजण आनंदाने नाचतात. विहिरीमध्ये डुबकी मारण्याची चढाओढ त्या सोबतच सजवलेल्या होड्यांची स्पर्धा आणि संगीत नृत्याचा कार्यक्रम देखील यावेळी पाहायला मिळाला.