
चिपळूण : चिपळूण नवरात्रीच्या शकतीपर्वात नेत्राचिकित्सा शिबिरातील लाभार्थ्यांना उत्तम बांधणी असलेले चष्मे प्रदान करण्यात आलेत. जीवन विकास सेवा संघ, व ओतारी आई चॅरिटेबल फाउंडेशन यांचे हे समाजसेवेचे व्रत अखंड सुरु राहणार असल्याची ग्वाही या दोन्ही संस्थांच्या संस्थापक अध्यक्षा उद्योजक संगीता ओतारी यांनी दिली. संस्थेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या दोन्ही संस्था व बाजार नवरात्र मंडळातर्फे आयोजित शिबीर प्रसंगी ज्या रुग्णांना चष्मे गरजेचे होते त्यांना संस्थेतर्फे ते देण्यात आले. या आनंदाच्या क्षणी अनेकांनी आपल्याला प्रतिक्रिया देताना संस्थेच्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. डॉ. कुंदन ओतारी, निसर्ग व प्राणी अभ्यासक डॉ. तेजस ओतारी, संस्थेचे मानसशास्त्रज्ञ व व्याख्याते दिपक माळकरी, आरोग्य विभाग प्रमुख पूजा पुजारी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमापूर्वी संस्थेने आयोजित केलेल्या आरोग्याची काळजी कशी आणि का घ्यावी, आयुष्यात व्यायामाचे महत्व, आजची बदललेली जीवनशैली, पूर्वीची जीवनशैली, आहार, नित्य ध्यान प्राणायाम, शरीराची काळजी व तंदुरुस्त शरीरासाठी महिला, वृद्ध यांनी काय केले पाहिजे याबाबत पूजा पुजारी यांनी मार्गदर्शन केले.
संगीता ओतारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन जे कार्य हाती घेतले आहे त्याला सर्वांनी साथ देऊया असे स्पष्ट करीत अनेक उदाहरणे दिली. हे कार्य खूप मोठे आहे. महिला, मुली, निराधार महिलांना उत्तम मार्गदर्शन करणारे व महिला सक्षमीकरणासाठीचे उपक्रम याबाबत त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी धनंजय काळे, स्टाफ रविना पवार, यशवंत गोरीवले व सर्व सहकारी वर्गाने परिश्रम घेतले. दिपक माळकरी यांनी आभार मानले.










