साने गुरुजी संस्कार शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: ब्युरो
Published on: May 28, 2024 07:23 AM
views 303  views

वेंगुर्ला : "शिबिरामध्ये मुले गाणी, गप्पा, गोष्टी, छंद यामध्ये रमतात आणि मोबाईल पासून दूर राहतात. मोबाईल पासून मुलांना दूर ठेवण्याचे हे विविध मार्ग आहेत. शिबिरातून आपण एवढे शिकलो तरी खूप आहे." असे उद्गार बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांनी येथे काढले.

साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त बॅ. नाथ पै सेवांगण आणि माझा वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने  दि २२ मे २०२४ ते २६ मे २०२४ पाच दिवसाचे 'साने गुरुजी संस्कार शिबीर' आरोग्यधाम, उभादांडा, वेंगुर्ला  येथे आयोजित केले होते. शिबिराच्या समारोप प्रसंगी ॲड. परुळेकर बोलत होते. या शिबिराला  बाबासाहेब नदाफ, चंदन माटुंगे, सागर पाटील, राज कांबळे, मैत्रेयी चव्हाण, स्नेहल आचरेकर, राखी मयेकर, श्रावणी कुडाळी यांचे मार्गदर्शन लाभले.

पाच दिवसाच्या या शिबिरात ३२ मुलांनी सहभाग घेतला. त्यांना या शिबिरात देशभक्तीपर विविध गीते शिकवली गेली तसेंच एरोबिक्स, कॅलयेस्थेनिक्स, लेझीम, झांज, विविध नृत्य प्रकार शिकवण्यात आले. विद्या राणे यांनी स्त्री पुरुष समता या विषयावर, तर सरिता पवार यांनी वाचनाचे महत्त्व या विषयावर मुलांशी संवाद साधला. हरिश्चंद्र सरमळकर गुरुजी यांनी मुलांना कागदाच्या कातर कामाची कला शिकवली. मुलांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न, मोबाईलचे दुष्परिणाम, बुवाबाजी व अंधश्रद्धा या विषयावर सुंदर पथनाट्ये सादर केली. मुलांनी शिबिरात भरपूर धमाल केली. अशी शिबिरे वारंवार आयोजित करण्यात यावीत अशी अपेक्षा मुलांनी आणि पालकांनी व्यक्त केली. शिबिर समारोप प्रसंगी शशांक मराठे, दिलीप गिरप, साक्षी वेंगुर्लेकर, साक्षी परब, सौ. नार्वेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शिबिर यशस्वी करण्यासाठी ॲड. देवदत्त परुळेकर, मंगलताई परुळेकर, राजन गावडे, खेमराज गावडे, यासीर मकानदार, दिलीप गिरप, अमृत काणेकर, सीमा मराठे  यांनी विशेष मेहनत घेतली.