
कुडाळ : मुंबई गोवा महामार्गाच काम निकृष्ट दर्जाचं झाले आहे. महामार्ग खड्डेमय झाला आहे. त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. त्याची जबाबदारी ठेकेदार, महामार्ग अधिकारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घ्यावी. तसेच माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जो ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे तो मागे घ्यावा आणि त्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत केली
कुडाळ एमआयडीसी येथे शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री.पारकर बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, माजी उपसभापती बबन बोबाटे, उप तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी नगरसेवक संतोष शिरसाट, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, अवधूत मालंडकर, शोएब खुल्ली अमित राणे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.पारकर म्हणाले की, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यामागे मोठं षडयंत्र आहे. अधिकाऱ्याला जाब विचारला म्हणून वैभव नाईक यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला मग गेल्या दहा वर्षात या मार्गावर अनेक अपघात झाले त्या मार्गावर काम करणाऱ्या मुबंई गोवा महामार्ग क्र.६६ च्या जबाबदार अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी केली का? खरंतर याबाबत जिल्हा शिवसेनेने अनेक आंदोलने केली. पण या सगळ्या प्रशासन यंत्रणेवर, सरकारी अधिकाऱ्यांवर, पोलीस यंत्रणा,ठेकेदार, सत्ताधारी नेते यांच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. झाराप येथे दुर्दैवी अपघात झाला, त्या अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार वैभव नाईक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्या ठिकाणी जनतेच्या संतापाचा कडेलोट होताना दिसत होता, यावेळी वैभव नाईक यांनी जनतेच्या वतीने प्रशासनाला जाब विचारला. पण खरं तर ज्या प्रश्नांकडे सरकारने, नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी लक्ष दिला पाहिजे होता, पण तो दिला नाही. घटने दरम्यान ॲक्शन वर रिअॅक्शन आली. ही त्या ठिकाणी साहजिक आहे.
गेल्या दहा वर्षात खारेपाटण ते बांदा या संपूर्ण मार्गावर शेकडो अपघात झालेले आहेत, अनेकांचे जीव गेले, काहीजण जायबंदी झाले. पण त्यांना कुणी काही दिलं नाही. दुसरीकडे हजारो कोटी रुपयांची बिले ठेकेदाराला दिलेली आहेत. या कामांची कुठली खातरजमा या अधिकाऱ्यांनी केली का? आज ग्रामीण भागातील बहुतांश सर्व पुल ही नादुरुस्त आहेत, कमकुवत आहेत. एकही पुल सुस्थितीत नाही ही वस्तुस्थिती आहे. या महामार्गावर दर महिन्याला शेकडो अपघात होत आहेत. सद्यस्थितीत असलेले मिडलकट अधिकृत नाहीत. प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार मिडलकट तयार केलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघात होतात, याला जबाबदार कोण? प्रशासनाची सर्व यंत्रणा हायवेसाठी असताना, यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले असताना सुद्धा हायवेवर धोकादायक वळणे कशी काय राहिली? अपघाताचे हे सत्र कधी थांबणार? खरतर जिल्हावासियांनी हायवेसाठी स्वतः पुढाकार घेऊन जमीनी दिल्या ,बहुतांशी जणांना मोबदला सुद्धा अद्याप मिळालेला नाही. जनतेच्या या सहकार्याच्या मोबदल्यात अशा प्रकारचे अपघात मिळत आहेत का ? त्यामुळे हा हायवे आहे की सिंधुदुर्गवासियांच्या मृत्यूचा जबडा असा प्रश्न जनतेसमोर उपस्थित होत आहे.
आज आरओडब्ल्यू लाईनवर सुध्दा अनेकांचे अतिक्रमण आहे. याकडे हायवेचे अधिकारी का लक्ष देत नाहीत? येथील सरकारी यंत्रणेने जनतेला गृहीत धरलेलेआहे. आम्ही कुठलाही भ्रष्टाचार केला तरी आमचं कुणीही वाकड करू शकत नाही,अशी हायवे अधिकाऱ्यांची भावना झाली आहे का? असे एक ना अनेक प्रश्न श्री.पारकर यांनी उपस्थित करुन हायवे विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले अजूनही वेळ गेलेली नाही, राष्ट्रीय महामार्गाचे जे ठेकेदार आहेत त्यांनी जबाबदारी घेऊन जिल्ह्यातील महामार्गाचा रस्ता चांगला दर्जेदार जिल्हावासियांसाठी निर्माण करावा. हायवेचे कनिष्ठ अधिकारी मुकेश साळुंखे हे सातत्याने जनतेच्या प्रश्नावर कुठल्याही प्रकारचे उत्तर देत नाहीत. ते स्वतः गुर्मीमध्ये अरेरावीमध्ये जिल्ह्यात वावरत आहेत. अशा मुजोर अधिकाऱ्याची जिल्ह्यातून बदली करावी आणि कार्यक्षम अधिकारी द्यावेत. अशी शिवसेनेची मागणी असल्याचे श्री.पारकर यांनी सांगितले.










