
कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास खाते महायुती सरकरच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात राज्यातील पहिल्या ५ क्रमांकामध्ये खाते आहे. जिल्ह्यातील अनेक प्रश्न गेल्या ८ महिन्यांत मार्गी लागलेले आहेत. मात्र, माजी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी गेल्या १० वर्षांत त्यांनी काय केले? दोघेही निष्क्रीय ठरल्यामुळे त्यांचा पराभव झाला. महायुतीतील भाजप व शिवसेना हे दोनच पक्ष जिल्ह्यात सक्रीय काम करत आहेत. वरिष्ठ नेते अंतर्गत कुरघोडीबाबत मार्ग काढतील. परंतु उबाठातील अंतर्गत वादावर लक्ष द्या. सुशांत नाईक यांनी आपल्या बिजलीनगरमधील प्रभागात असलेल्या समस्यांवर लक्ष द्यावे, अन्यथा जनता त्यांचाही पराभव करेल. नाईकांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर टीका करताना विचार करावा, असा इशारा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी दिला.
कणकवली येथील खासदार नारायण राणे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अण्णा खाड्ये, शहराध्यक्ष सागर राणे, तालुका सरचिटणीस प्रज्वल वर्दम, तालुका उपाध्यक्ष प्रशांत राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मेस्त्री म्हणाले, पालकमंत्री नितेश राणे यांनी जनता दरबार असेल किंवा लोकांच्या गाठीभेटी घेत दांडगा लोकसंपर्क ठेवलेला आहे. अनेक लोकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा एकमेव एआययुक्त झाला आहे. विकासात्मक गती जिल्ह्याला प्राप्त झालेली आहे. नापणे धबधब्यावर आकर्षक काचेचा पूल उभारण्यात आलेला आहे. विकसित जिल्हा म्हणून राज्याच्या पटलावर सिंधुदुर्ग जिल्हा हा पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून येत आहे. तसेच वंचित समाजाचा पालकमंत्र्यांनी राज्यात पहिल्यांदा जनता दरबार घेतला. त्यामुळे विरोधकांना फक्त केवळ टीका करण्याचे काम उरले आहे.
भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नीतिमत्ता आहे खरीच बाब आहे. मग, ज्या उपकर यांच्या मांडीला मांडी लावून बसताना त्यावेळी तुमची नीतिमत्ता कुठे असते? आता २२ जून रोजी श्रीधर नाईक स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात उबाठाचे अनेक नेते व्यासपीठावर असताना उपरकर कुठे होते? असा प्रश्न जनमाणसांत आहे, असेही मेस्त्री म्हणाले.
मंत्री नितेश राणे भाजपामध्ये ठेकेदाराचा प्रवेश घेत आहेत, असे जर सुशांत नाईक म्हणता, र तुमचा ठेकेदाराचा पक्ष होता का? यापुढे टीका करताना सुशांत नाईक यांनी विचार करून करावी. भाजप जिल्हाध्यक्ष ,पालकमंत्री हे महायुतीतील वादाबाबत निर्णय घेतील. जिल्ह्यात दोनच पक्ष कार्यरत आहेत.वरिष्ठ पातळीवर लवकरच मार्ग निघेल. त्यापलीकडे सुशांत नाईक हे जिल्ह्याचे नेते नाहीत. आपल्या उबाठाचे जिल्हाप्रमुख पद कसे मिळेल यावर त्यांचा लक्ष आहे. आपल्या प्रभागातील वाढलेले झाडी झुडपे, तुंबलेली गटारे यावर काम करावे , जेणेकरुन त्याप्रभागातील जनतेला दिलासा मिळेल , असा टोला मेस्त्री यांनी लगावला.
मंत्री नितेश राणे पहिल्या निवडणुकीला २५ हजार आणि दुसºयांदा २७ हजार तर आता ५८ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत.निवडणूक लढवल्यानंतर मताधिक्य टिकवणे कठीण असते. निष्क्रिय म्हणून आमच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा आपले भाऊ वैभव नाईक यांचा पराभव झाला, लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांचा पराभव झाला आहे. सिंधुदुर्गात भाजपा हा मोठा पक्ष आहे.जिल्ह्यात आज उबाठा हा पक्ष बचतगट राहिला आहे. फक्त नेते आहेत. उबाठा अंतर्गत चाललेल्या गटबाजीत तुम्ही कोणत्या गटाचे आहेत, हे सुशांत नाईक यांनी जाहीर करावे, असे आव्हान मेस्त्री यांनी दिले आहे.