
मालवण : मालवण रेवंडी येथील वाळू कामगाराच्या हत्येप्रकरणी आजपर्यंत पोलीसांनी सहा संशयीतांना अटक केली आहे. यातील एकाला २८ जानेवारीपर्यंत तर उर्वरीत पाचही जणांना ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कलावधीत संशयीतांकडून गुन्ह्याचा तपास, वापरण्यात आलेली हत्यारे आणि तळाशिल ते रेवंडी असा प्रवास करण्यासाठी वपारण्यात आलेली बोट ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
रविवारी १९ रोजी गुन्हा घडल्यानंतर पोलीसात तक्रार दाखल झाल्यावर पोलीसांनी तातडीने ललित महादेव देऊलकर याला ताब्यात घेतले होते. देऊलकर याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत संपल्यानतंर त्याच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ झाली आहे. तर यातील अन्य चार संशयीत असलेले तेजस पंढरीनाथ सादये (२५), रामचंद्र लक्ष्मण तांडेल (२७), भारत जगन्नाथ खवणेकर (३२), बाबाजी गणपत तारी (४५) या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तर शनिवारी किर्तीराज मधुकर चोडणेकर (३६) याला ताब्यात घेण्यात आले. या पाचही जणांना न्यायालयात हजर केले असता ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत या गुन्हयात सहा जणांचा समावेश असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
रेवंडी जेटी परिसरात वाळू काढण्यात येणाऱ्या बोटीची दुरुस्ती आणि स्वच्छता पाच कामगार करीत होते. त्यावेळी अचानक तळाशिल येथून एका छोट्या होडीने पाच युवक तेथे आले. त्यांच्या हातात दगड, धारदार हत्यारे आणि दांडे होते. त्या साह्याने त्यांनी कामगारांवर हल्ला चढविला. यात एका कामगाराच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तर हरिलाल सिंह (५४, रा. तूंडू, पोस्ट मत्नोग, जि. लातेहार, राज्य-झारखंड) यांच्या डोकीवर आणि गालावरही दांड्याने मारहाण करण्यात आली. यात ते खाडीपात्रात कोसळले. इतर काहींनी बोटीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही त्या युवकांनी मारहाण केली. मारहाण केल्यानंतर सर्व युवक पुन्हा त्याच छोट्या होडीतून पळून गेले. भा. न्या. संहिता कलम १०३, १०९, १८९ (२), १८९ (४), १९०, १९१ (२), १९१ (३), ११८ (१), ३५१ (३), ३५२, ३२४ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, मारहाण करणे आणि मारहाणीत मृत्यू होणे, एकत्रितपणे गुन्हा करणे, धमकी देणे तसेच इतरही गोष्टींचा समावेश या कलमांमध्ये करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव व पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत पेडणेकर, पोलीस हवालदार सुशांत पवार, सुहास पांचाळ करीत .