
गोपुरी येथे प्रभाकरपंत कोरेगावकर यांचा ५७ वा स्मृतीदिन
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे|
उदास विचारे वेच करी ||
या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे जीवन व्यतीत केलेल्या प्रभाकरपंत कोरगावकर यांच्या नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्वाची आठवण करत त्यांच्या समाजसेवेचा व गांधी विचारांचा वारसा आंम्ही गोपुरीच्या माध्यमातून निश्चितपणे जोपासत आहोत, असे प्रतिपादन गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले. यावेळी प्रभाकर पंतांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले.
प्रभाकरपंत कोरगावकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारकरांना आश्रय देऊन त्यांना आर्थिक सहकार्य करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. स्वातंत्र्योत्तर काळात भूदान चळवळीत खूप मोठे योगदान दिले. गोपूरी आश्रम वागदे, हिंद कन्या छात्रालय, ग्रामसेवा संघ, समाज प्रबोधन संस्था अशा अनेक संस्था प्रभाकर पंतांच्या आश्रयाने उभ्या राहिल्या. आज या संस्थांच्या माध्यमातून प्रभाकर पंतांच्या स्मृती चिरंतन आहेत, असे भावपूर्ण उद्गार गोपुरी आश्रमाचे सचिव बाळू मेस्त्री यांनी काढले.
यावेळी गोपुरी आश्रम शाचे उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, खजिनदार अमोल भोगले, सदस्य संदीप सावंत, नितीन तळेकर, विनायक सापळे, सुरेश रासम, व्यवस्थापक सदाशिव राणे, श्री काळसेकर तसेच वागदे येथील नागरिक व गोपुरी कर्मचारी वृंद उपस्थित होते.