रत्नागिरी : गेल्या ५ वर्षांतील उत्तम आर्थिक कामगिरी लक्षात घेता राज्य सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन, निवृत्तीवेतन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यातील १५ सक्षम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या १५ जिल्हा बँकांमध्ये कोकणातील रत्नागिरी, ठाणे, रायगड व सिंधुदुर्ग या जिल्हा बँकांचा समावेश आहे. सलग १२ वर्षे रत्नागिरी जिल्हा बँकेचा नक्त एन.पी.ए. ०% असून, बँकेला सलग १३ वर्षे 'अ' ऑडिटवर्ग प्राप्त झाला आहे. त्यामुळेच बँकेला राज्य शासनाचे सहकारनिष्ठ व सहकार भूषण या दोन पुरस्कारांसह अन्य १७ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
राज्यातील १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना २०२४- २५ या वर्षासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी बँक खाते उघडण्याकरिता आणि निवृत्तीवेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता तसेच सार्वजनिक उपक्रम / महामंडळे यांचेकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी प्राधिकृत करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे, असे वित्त विभागाने याबाबत दि.१४.०१.२०२५ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे. यामुळे या १५ जिल्हा बँकांमध्ये आता शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तीवेतन जमा केले जाऊ शकेल. यासाठी या बँकांनी महिनाभरात राज्य सरकारसोबत सामंजस्य करार करणे गरजेचे आहे.
शासन निर्णयामध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया अशा १५ जिल्हा बँकांचा यात समावेश करणेत आला आहे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये कायम सेवेत असलेल्या ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन जमा होते, अशा कर्मचाऱ्यांसाठी रू. ३० लाख रक्कमेपर्यंत ग्रुप अपघात विमा योजना सन २०२१-२२ पासून सुरू केली आहे. सदर विमा हप्त्याची रक्कम वेतनधारकांकडून वसुल न करता बैंक स्वतः विमा कंपनीला आदा करते.
दि. १ जानेवारी २०२५ पासून बँकेने "स्वर्गीय गोविंदरावजी निकम मुदत ठेव योजना" या नावाने दि.०१.०१.२०२५ ते दि.३०.०६.२०२५ या कालावधीकरीता मुदत ठेवीत गुंतवणूक करणाऱ्या वैयक्तिक ठेवीदारांकरीता रू.५०,०००/- किंवा त्यावरील रक्कमेकरीता २५० दिवसांकरीता ८.५०% व्याजदराने विशेष ठेव योजना सुरू केली आहे. सदर योजनेचा अनेक ठेवीदारांनी लाभ घेऊन आपली ठेव सुरक्षित केली आहे.
बँकेने RTGS, NEFT, ATMRuPay Card, SMS Alert, POS Transaction, E.Com, Cibil Report, Missed Call Alert, Card Safe, CTS, IMPS, Mobile Banking, QR Code, UPI इ. अत्याधुनिक बँकींग सुविधा ग्राहकांसाठी सुरू केल्या आहेत. या योजनांचा बँकेच्या सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.