'नामा'तून साकाराली विठू माऊली…!

श्रीरंग फाउंडेशन आणि नरेपार्क विशेष विद्यार्थ्यांच्या शाळेचा उपक्रम
Edited by:
Published on: July 11, 2024 07:52 AM
views 289  views

सावंतवाडी : श्रीरंग फाउंडेशन दरवर्षी विशेष विद्यार्थ्यांना घेवून अनोख्या पद्धतीने आषाढी सोहळा साजरा करत असते. यावर्षी देखील एक वेगळं आकर्षण घेवून ते विठ्ठल भक्तांच्या भेटीला आले. यंदा नरेपार्क शाळेतील विशेष विद्यार्थ्यांनी मिळून नामातून विठ्ठल साकारला आहे. वारकरी संप्रदायात नामाला खूप महत्व आहे. मुखातून निघालेल्या हरीनामाने अंतकरण शुध्द होते,सदाचाराला चालना मिळते तर कपाळी लावलेल्या नमाने मनं शांत, उत्साही राहते. त्यामुळे आपले विशेष विद्यार्थ्यांनी हरी 'नामा'चा गजर करत 'नामा'चे ठसे उमटवत माऊलीचे निर्मळ सात्विक रूपं साकारले आहे.

कपाळावर नाम लावल्याने देवाची कृपा कायम राहते असं मानलं जातं. नामाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचं मन शांत राहतं. आज्ञा चक्रावर गंध लावल्याने केवळ मनःशांतीच नाही तर सकारात्मक ऊर्जाही मिळते. त्यामुळे हिंदू धर्माशी निगडित शैव, वैष्णव आणि शाक्त पंथातील व्यक्ती पूजेवळी श्रद्धा आणि विश्वासपूर्वक कपाळावर नाम,गंध लावतात. कला दिग्दर्शक सुमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात आली आहे. नाम म्हणजेच कपाळी टिळा लावण्या बाबतीत शास्त्रीय संशोधनदेखील झालं आहे. टिळा लावण्याचे अनेक वैज्ञानिक फायदे आहेत. अशा नामातून विठ्ठल साकरण्यात आल्याचे सुमित पाटील यांनी सांगितले.

शास्त्रीय अभ्यासानुसार, नाम लावल्यानं कपाळ थंड राहतं आणि व्यक्तीला मानसिक शांती मिळते. यामुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते. नामलावल्यानं व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो. यामुळे व्यक्ती आपले निर्णय अगदी ठामपणे घेऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. 

नाम लावल्यानं मेंदूतल्या सेरोटोनिन आणि बीटा एंडॉर्फिनचा स्राव संतुलित राहतो. यामुळं दु:खाच्या भावना दूर होतात आणि व्यक्ती आनंदी राहते. डोकेदुखीच्या समस्येला तोंड देण्यासाठीदेखील नाम उपयुक्त ठरते. अशाप्रकारे कपाळी नाम लावणं हे धार्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्टीनं चांगलं मानलं जातं.

श्रीरंग फाउंडेशन आणि नरेपार्क शाळेच्या माध्यमातून या निमित्ताने विद्यार्थ्यांनी काही आनंदाचे क्षण अनुभवले. यात आमचे कर्मचारी तसेच पालकही सहभागी झाल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी राहूरकर यांनी सांगितले. आमच्या विद्यार्थ्यांनी नमातून माऊली साकारली. या माध्यमातून प्रत्यक्षात माऊलीचा आमच्या विशेष विद्यार्थ्यांच्या भेटीला आल्याचेही त्या म्हणाल्या. समीक्षा मोहिते, उल्का लोके आणि श्रध्दा ढमाले या शिक्षकांचे तर प्रविण दाभोळकर, साक्षी खाड्ये, सुजित पासवान, राकेश जंगीद आणि सुदर्शन सावंत या कलाकारांचे ही सहकार्य लाभले.