'साईकृपा अपंग शक्ती'चे दिव्यांगांसाठीच कार्य कौतुकास्पद : प्रसन्ना देसाई

Edited by: दिपेश परब
Published on: July 15, 2025 13:41 PM
views 131  views

वेंगुर्ले :  दिव्यांग बांधव हे समाजातील एक अविभाज्य घटक असून शासनाच्या विविध योजना या बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे जे काम करत आहेत, ते फार कौतुकास्पद आहे. आज प्रत्येक गावातील दिव्यांग बांधव हा सक्षम बनला पाहिजे. यासाठी गावागावात जाऊन अशा विभाग वार मेळाव्यातून या सर्व बांधवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना परिपूर्ण माहिती देण्यासाठी साईकृपा संस्था फार तळमळीने कार्य करत आहे. यापुढे सुद्धा ही संस्था दिव्यांग बांधवांच्या पाठी खंबीरपणे उभे राहून काम करणार आहे. तसेच तुमच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे . त्यासाठी आपण सर्वजण साईकृपा अपंग संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांचे आभार मानुया असे प्रतिपादन प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले .

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल सिंधुदुर्ग व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने वेंगुर्ले तालुक्यातील मठ ग्रामपंचायत सभागृहात दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी मठ सरपंच रुपाली नाईक, पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील, ग्रामसेवक वजराठकर, अजित नाईक, शिवराम आरोलकर, हरेश वेंगुर्लेकर मान्यवर म्हणून उपस्थित होते.

या मेळाव्यामध्ये सभासद नोंदणी, ऑनलाईन प्रमाणपत्र, रेल्वेपास, पेन्शन योजना, स्वावलंबन कार्ड, शिलाई मशीन, बालसंगोपन, घरघंटी घरकुल आदी योजनांची माहिती दिली. तसेच गरजू साहित्याची पण नोंदणी केली. तसेच कमी दृष्टि, पॅरालीसीस, अपघात यामुळे आलेल्या दिव्यांगाची नोंदणी करण्यात आली. तसेच उपस्थित दिव्यांगांना संस्थेच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. तसेच सर्व दिव्यांगांची अल्पोपाहाराची व्यवस्था हरेश वेंगुर्लेकर यांनी स्वखर्चातून केली .

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी साईकृपा संस्थेचे कर्मचारी संजना गावडे, प्रणाली दळवी, विशाखा कासले, हर्षद खरात यांनी विशेष प्रयत्न केले.