असुर्डे विद्यालयात सह्याद्रि शिक्षण संस्था स्थापना दिन साजरा

Edited by: मनोज पवार
Published on: November 30, 2024 15:51 PM
views 70  views

 चिपळूण : सह्याद्रि शिक्षण संस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असुर्डे आंबतखोल या विद्यालयात सह्याद्रि शिक्षण संस्था सावर्डे या संस्थेचा 67 वा संस्था स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये शिक्षक भाषणे, विद्यार्थी भाषणे, भित्तिपत्रक प्रदर्शन यांचा समावेश होता. विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट यांच्या मार्गदर्शनानुसार या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक भानुदास देसाई यांनी स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांच्या विषयी तसेच सह्याद्रि शिक्षण संस्थेविषयी सखोल माहिती सांगितली. यावेळी बोलताना ते म्हणाले की,'ज्योत ज्ञानाची दौलत राष्ट्राची 'हे ब्रीदवाक्य घेऊन स्व. निकम साहेबांनी जून 1957 पासून सावर्डे येथे न्यू इंग्लिश स्कूल या  माध्यमिक विद्यालयाची सुरुवात केली. 29 नोव्हेंबर 1958 रोजी संस्थेला अधिकृत मान्यता मिळाली.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. स्व. अनुराधाताई निकम,स्व. भाऊसाहेब महाडिक,स्व. शिवाजीराव घाग,स्व. बाळकृष्ण पवार स्व.अशोकराव विचारे इ.अत्यंत प्रामाणिक,निष्ठावंत व त्यागी सहकारी यांच्या साह्याने या संस्थेचा विकास व उत्कर्ष झाला. या संस्थेने प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, इंग्रजी माध्यमातून शिक्षण,व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शाखांचा विस्तार केला.अनेक वसतीगृह सुरु करून गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या राहण्याची, खाण्याची व शिक्षणाची सोय केली. प्रत्येक विद्यार्थ्याला  उज्वल भविष्य घडविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व व्यावसायिक शिक्षणाची संधी या संस्थेने सावर्डे व सावर्डे परिसरात उपलब्ध करून दिली आहे.आपण सर्वांनी या शैक्षणिक सुविधांचा लाभ घेऊन आपले  उत्तम करिअर करावे असे आवाहन त्यांनी उपस्थित  विद्यार्थ्यांना केले.साहेबांच्या नंतर संस्थेचे कार्याध्यक्ष लोकप्रिय कार्यसम्राट आमदार शेखरजी निकम सर  या संस्थेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत असेही त्यांनी सांगितले.

श्री बापूसाहेब जमादार यांनी सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या विविध शाखांची माहिती सांगितली. तसेच या संस्थेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी संपूर्ण देशभरच नव्हे तर जगभर सध्या आपलं करिअर करत आहेत याची माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी स्व.निकम साहेबांना सहकार्य करणाऱ्या सर्व महान व्यक्तींविषयी माहिती सांगितली. स्व. निकम साहेब तसेच विद्यमान कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम सर यांनी घालून दिलेले आदर्श व संस्कार सर्व विद्यार्थ्यांनी आचरणात आणावेत व आपले भविष्य उज्वल करावे असे यावेळी त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. अश्मी कोचीरकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर निलेश चव्हाण यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.