मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी शासन पातळीवर नव्यानं ड्राफ्ट तयार

प्रश्न कायमचा मार्गी लागेल : दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: August 28, 2025 15:38 PM
views 78  views

सावंतवाडी : सावंतवाडी राजघराण्याबाबत मला नेहमीच आदर आहे, तो कायम राहील. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न एका सहीमुळे रखडला आहे. सामंजस्य करारातील काही अटी शर्तीमुळे ती सही राहिली आहे. मात्र, त्यासाठी शासन पातळीवर नव्यानं ड्राफ्ट तयार करण्यात आला असून त्यावर लवकरच सह्या होतील. हा प्रश्न कायमचा मार्गी लागेल असा विश्वास माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, सूरज परब आदी उपस्थित होते. केसरकर म्हणाले, सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागे संदर्भात राजघराण्यानं नेहमीच सहकार्य केले आहे. त्यांच्या सह्या झाल्या असल्या तरीही सामंजस्य करारपत्रातील एका अटीमुळे एका व्यक्तीकडून सही व्हायची बाकी आहे. त्यामुळे करारपत्राचे नव्याने ड्राफ्टिंग करण्याचे काम सुरू आहे. ते होताच पुन्हा सर्वांच्या सह्या घेण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सावंतवाडी टर्मिनसवर काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. खासदार नारायण राणे यांनी यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे लवकरच आणखीही काही गाड्यांना सावंतवाडी स्थानकात थांबा मिळेल, अशी माहिती श्री. केसरकर यांनी दिली. तर रत्नसिंधू योजनेच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाले आहेत. त्यामुळे या योजनेतून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तर पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल देखील होत आहे. शेतकरी, मच्छीमार, महिला बचतगट यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे या योजनेला मुदतवाढ मिळावी यासाठी माझे प्रयत्न सुरू असून या योजनेला निश्चितच मुदतवाढ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच आंबोली गेळे व चौकूळ येथील जमिनीच्या सातबारावर वने म्हणून नोंद असल्याने त्याचे वाटप रखडले आहे. त्यामुळे या संदर्भात लवकरच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या बैठकीत सदरचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी वेंगुर्ले गवळीवाडा येथील गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला जमीनप्रश्न सोडविल्याबद्दल गवळी वाडा येथील ग्रामस्थांनी आ. केसरकर यांच्या निवासस्थानी उपस्थित राहत त्यांचे विशेष आभार मानले.