पुरोहित मंडळ रत्नागिरीतर्फे निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सग्रह नवचंडी याग

सलग चार वर्षे होतोय उपक्रम !
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 17, 2023 11:32 AM
views 170  views

रत्नागिरी : रत्नागिरीतील पुरोहित मंडळातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सग्रह नवचंडी याग गुरुवारी संपन्न झाला. सलग चार वर्षे माजी खासदार निलेश यांच्या वाढदिवसाला पुरोहित मंडळ नवचंडी याग करते. 


उपासनेशिवाय अपुर्व, अद्रुष्ट निर्माण होत नाही. हा आपल्या भारतीय वैदिक संस्कृतीचा सिद्धांत आहे. त्यानुसार अतिप्राचीन कालापासून निरनिराळ्या उपासना आपल्या भारत देशात चालत आल्या आहेत. सध्याच्या या कलियुगामध्ये विनायक आणि चंडी उपासना ही सर्वात अतीशिघ्र फलदायी आहे, असे सांगितले आहे. चंडी-आदिशक्ती हे जगन्मातेचेच एक नाव आहे. ही चंडी या विश्वाच्या उत्पत्तीला, स्थितीला, आणि प्रलयाला कारणीभूत आहे. चंडी उपासना म्हणजेच आपल्या कुलदेवतेची उपासना होय. आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी वेदशास्त्र, धर्मग्रंथ, पुराणामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. त्यामधील एक उपाय म्हणजेच सप्तशती पाठ वाचन होय.देवीला सप्तशती म्हणजेच देवीमहात्म्य अतीशय प्रिय आहे.


या सप्तशती ग्रंथामध्ये देवीचे महात्म्य, स्तुती यांचे वर्णन केले आहे. सप्तशती म्हणजे सातशे श्लोक. या ग्रंथामध्ये एकुण तेरा अध्याय आहेत. अश्या या तेरा अध्यायांचे वाचन जर शास्त्रशुद्ध पध्दतीने केले तर आपल्याला त्याचा अनुभव आल्याशिवाय रहाणार नाही. या देशामध्ये सप्तशतीचा दररोज नित्यपाठ करणारे असंख्य लोक आहेत. याचा पाठ विशेषकरुन नवरात्रामध्ये वाचतात. परंतु सध्या कलीयुगामध्ये आपल्यावर येत असलेल्या संकटांवर जर मात करायची असेल तर सप्तशतीचे वाचन मात्र नित्य असावे. कर्म सकाम असो किंवा निष्काम असो, ते यथासांग शास्त्रवत घडलेच पाहिजे. तरच त्याची फलप्राप्ती सिद्ध होते. 


पुरोहित मंडळ रत्नागिरी तर्फे निलेश राणे यांच्या जन्मदिनानिमित्त दर वर्षी सग्रह नवचंडी याग केला जातो. दोन दिवसाच्या ह्या उपासनेत प्रथम दिवशी निलेश राणे यांच्या आरोग्य, यश, कीर्ती आणि आगामी निवडणूक ह्या मध्ये यश मिळण्याच्या दृष्टीने संकल्प करून देवता स्थापन आणि 10 पाठ वाचले जातात. दुसऱ्या दिवशी अग्नीस्थापना करून ग्रह यज्ञ करून सप्तशतीचे मिश्र द्रव्याने हवन केले जाते. तसेच कुमारीपुजन, सुवासिनी पूजन, तर्पण मार्जन करून सर्व कर्माची समाप्ती करण्यात येते. असा उपक्रम असतो. 


या कार्यक्रमात पुरोहित मंडळ रत्नागिरीचे वे.मु.विश्वास (नाना) जोशी, दिनेश जोशी, विशाल खेर, श्रीपाद कुलकर्णी, अमोल जोशी, संदीप परांजपे, रविशंकर पंडित , संदीप वीरकर, दिपेश काळे, धनंजय नवाथे आणि सर्व पुरोहित सहभागी झाले होते.