
देवगड : येथील दी देवगड अर्बन को-ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी सदाशिव ओगले यांची तर उपाध्यक्षपदी अभय बापट यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचे अभिंनदन केले.
बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत ‘शिवम् सहकार’ पॅनेलचा विजय झाला होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पुरस्कृत ‘सहकार समृद्धी’ पॅनेलचा पराभव करून सर्व १२ जागांवर विजय मिळवला होता. शिवम पॅनेलची एक जागा आधीच बिनविरोध झाल्यामुळे बँकेतील सर्व १३ जागा ‘शिवम् सहकार’ पॅनेलकडे आल्या होत्या. यासाठी आज बँकेच्या सभागृहात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रीया झाली.
अध्यक्ष पदासाठी भाजप पुरस्कृत सदाशिव ओगले आणि अमोल तेली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उपाध्यक्ष पदासाठी भाजप पुरस्कृत समीर पेडणेकर यांनी आणि राष्ट्रवादी पुरस्कृत अभय बापट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर अमोल तेली आणि समीर पेडणेकर यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी एक -एकच अर्ज शिल्लक राहिल्याने अध्यक्षपदी भाजप पुरस्कृत सदाशिव ओगले यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी पुरस्कृत अभय बापट यांची बिनविरोध निवड झाली.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचे नवनिर्वाचित संचालकांनी अभिनंदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) माणिक सांगळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उर्मिला यादव तसेच सहायक निबंधक (सहकारी संस्था) अनिल राहिंज यांनी काम पाहिले. निवडीनंतर आमदार नीतेश राणे, माजी आमदार अॅड. अजित गोगटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, जिल्हा बँक संचालक अॅड. प्रकाश बोडस, बँकेचे मावळते अध्यक्ष दिलीप तथा भाई आचरेकर, मुकुंद फाटक यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.