
सावंतवाडी : माजी खासदार निलेश राणेंनी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करण्यापेक्षा तुमच्या पक्षातील ज्या लोकांच्या बाउंसरनी काल मार खाल्ला त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना समज द्यावी. खोटे आरोप करून खरं लपवता येणार नाही. ठेकेदारी मिळवण्यासाठी काय होतंय हे जनतेच्या समोर आलं असून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का कोसळला? हे देखील उघड झालं असल्याचा आरोप उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, निलेश राणे वैभव नाईकांवर टीका करत आहेत. पण, वैभव नाईक दोनदा निवडून आले आहेत. त्यांच कर्तृत्व कुणीही लपवू शकत नाही. महिलांसाठीच रूग्णालय कुडाळ येथे उभारले गेले. जिल्ह्यातील महिला आज तिथे उपचार घेतात. सर्वसामान्यांसाठी असं कार्य आमदारांच असलं पाहिजे. त्यामुळे राणेंनी नाईकावर टीका करण्यापेक्षा त्यांच्या पक्षातील लोकांच्या बाउंसरनी मार खाल्ला त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा शोध घेऊन योग्य समज द्यावा, खोटे आरोप करून खरं लपवता येणार नाही. ठेकेदारी मिळवण्यासाठी काय होतंय हे जनतेच्या समोर आलं आहे. छत्रपतींचा पुतळा का कोसळला हे देखील आज सिद्ध झालं आहे. टक्केवारीचे आरोप कालच्या प्रकारातुन सिद्ध होत आहेत असा आरोप श्री. राऊळ यांनी केला.
तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागात बाउंसर आणून दहशतवाद माजवण्याचा प्रकार घडला. बाउंसर संस्कृती जन्माला घालण्याचा प्रयत्न होत आहे. काल उबाठा शिवसेनेकडून आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठेचण्याच काम करण्यात आले. तिलारीतल काम, बांधकामच काम मॅनेज करण्यासाठी अशा प्रकारे बाउंसर आणले जातात हा दहशतवादाचा प्रकार आहे. ठेकेदार, स्थानिक राजकीय प्रतिनिधी ते काम करत आहे. त्यामुळे ही बाउंसर संस्कृतीला वेळीच ठेचण आवश्यक होत. लोकांनीही अशांना वेळीच रोखण आवश्यक आहे. दहशतवादाला विरोध करणारे दीपक केसरकर आता गप्प का आहेत? दहशतवादाला त्यांनी मिठी मारली आहे. दहशतवाद आता केसरकरांच्या मतदारसंघात जन्माला येत आहे. त्यामुळे केसरकर कधीही दहशतवाद आणि राणेंच्या विरोधात नव्हते. ते सगळं स्वार्थासाठी करत होते हे आज सिद्ध झालं आहे असा टोला हाणला. यावेळी शब्बीर मणियार, मायकल डिसोझा, शैलेश गवंडळकर, आबा सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.