
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अकाळी पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीवरून ठाकरे गट आक्रमक झाला असून, शासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषद घेऊन तहसीलदार व कृषी विभागाने पंचनामे न केल्याने शेतकऱ्यांचे व बागायतींचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी जन आक्रोश मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेण्याऐवजी तो थेट पालकमंत्री यांच्या घरावर नेण्याची मागणी राऊळ यांनी केली आहे. पालकमंत्री यांच्या घरावर मोर्चा काढल्यास आम्ही त्यांच्यासोबत असू, असेही राऊळ यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, रमेश सावंत, शिवदत्त मोकळे, संदीप गवस, अनुप नाईक, अशोक धुरी, प्रशांत बुगडे, उमेश नाईक, विनोद ठाकूर आदी उपस्थित होते.
प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप :
रुपेश राऊळ यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासन आहे तरी कोठे, असा सवाल केला. अकाली पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असताना चार-पाच दिवस वीज खंडित झाल्याने जिल्हा अंधारात राहिला. विजेअभावी यांत्रिक उपकरणे निकामी झाली. आरोग्य विभागाचा निष्काळजीपणाही समोर आला. बांधकाम खात्याची कामे १५ मे पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होती, ती झाली नाहीत. यामुळेही मोठे नुकसान झाले. मळगाव घाटात गॅस एजन्सीने गटारात पाईपलाईन टाकल्याने गटारातील खडी आणि माती रस्त्यावर येऊन मेथू रमेश यांचा अपघात होऊन त्यांचे निधन झाले. या घटनेला वीस दिवस उलटूनही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. गॅस ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र
राऊळ यांनी खासदार, आमदार आणि पालकमंत्री हे केवळ कामापुरते झाले असून, जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. आक्रोश मोर्चा काढण्याची भाषा करणाऱ्यांनी त्यांच्या पक्षाचे खासदार, आमदार आणि पालकमंत्री यांची लक्तरे वेशीवर टांगण्याचे चांगले काम केले आहे, असा टोला त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या आंदोलनाच्या वक्तव्याला लगावला. फळझाडांचे नुकसान झाले असून, त्यांची भरपाई मिळायला हवी. पंचनामे झालेले नाहीत. सत्तेत असणाऱ्यांनी आंदोलनाची भाषा करणे हे लोकांची बोळवण करणारे ठरणार असल्याचे राऊळ यांनी म्हटले. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे व हिताचे लोकप्रतिनिधींकडून पाहिले जात नाही. पालकमंत्री, आमदार आणि खासदार हे सक्षम नसल्यामुळेच संजू परब यांना आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा द्यावा लागत असल्याचे मत राऊळ यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचे आवाहन
संजू परब यांनी सरकारविरोधी भूमिका घेऊन जन आक्रोश मोर्चा काढून दाखवावा. त्यांनी तर थेट पालकमंत्र्यांच्या घरावरच मोर्चा काढण्याची तयारी करावी. ते पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढत असतील, तर आम्ही त्यांच्यासोबत असू, असेही रुपेश राऊळ यांनी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या निष्क्रियतेबद्दल संजू परब यांनी जन आक्रोश मोर्चा काढण्याचे केलेले आवाहन हे जनतेला आकर्षित करण्यासाठी असले तरी, तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून काही उपयोग नाही. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या घरावरच मोर्चा काढावा, असेही त्यांनी नमूद केले.