रेल्वेत विसरलेली बॅग आरपीएफने शोधून केली परत

बॅगेत होते तीन लाखांचे दागिने व‌ रोकड
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 30, 2025 15:59 PM
views 424  views

कणकवली : कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये विसरलेली प्रवाशाची बॅग रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक उपनिरीक्षक दुर्गेश यादव, हवालदार युवराज पाटील, कॉन्स्टेबल प्रदीप कुमार यांनी शोधून काढली व सदर प्रवाशाकडे सुपूर्द केली. विशेष म्हणजे बॅगेमध्ये तब्बल ३ तोळ्यांचे, २ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच ७ हजाराची रोकड होती. बॅग मिळवून दिल्याबद्दल प्रवासी विजय नेवरेकर (रा. मुंबई) यांनीही रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.


विजय नेवरेकर हे मडगावच्या दिशेने जात असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेसच्या मागील जनरल बोगीतून एकटेच प्रवास करत होते. विजय हे विलवडे रेल्वे स्थानकात उतरले. मात्र, आपली बॅग गाडीमध्येच राहिल्याचे लक्षात आल्यानंतर नेवरेकर यांनी ही बाब विलवडे रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्तरना सांगितल.  विलवडे रेल्वे स्टेशन येथून कणकवली रेल्वे स्टेशनच्या रेल्वे स्टेशन कळविण्यात आले. त्यानुसार आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक दुर्गेश यादव, हवालदार युवराज पाटील, कॉन्स्टेबल प्रदीप कुमार कणकवली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर दाखल झाले. सकाळी १० वा. सुमारास दाखल झालेल्या कोकणकन्या एक्सप्रेसच्या मागील जनरल बोगीची आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता नेवरेकर यांनी वर्णन केलेली बॅग आढळून आली.


युवराज पाटील यांनी सदर बॅग आरपीएफच्या कार्यालयात आणली.‌त्यानंतर श्री. नेवरेकर हे देखील तेथे दाखल झाले. तपासणी केली असता आतील दागिने, रोकड, गोळ्या, औषधे, महत्वाची कागदपत्रे आदी सर्व साहित्य बॅगेमध्येच होते. याबाबत नेवरकर यांनीही आरपीएफचे आभार मानले.