सावंतवाडीत शाही दसरा दिमाखात ; सीमोल्लंघन उत्साहात!

Edited by: विनायक गांवस
Published on: October 02, 2025 20:49 PM
views 42  views

सावंतवाडी : ४५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी संस्थांमध्ये दसरा आणि विजयादशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. राजघराण्याच्यावतीने राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते विधिवत पूजन करून सीमोल्लंघन करत धार्मिक विधी पार पडले.

सावंतवाडी राजघराण्याने संस्थानकाळापासूनची परंपरा कायम राखत दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला. राजेसाहेब खेमसावंत भोसले,  राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, 

युवराज लखमराजे भोंसले यांच्या उपस्थितीत पारंपरिक विधी आणि 'सोनं' लुटण्याचा सोहळा पार पडला. राजवाड्याचे राजपुरोहित शरद सोमण यांनी दसऱ्याच्या पूजेचे पौरोहित्य केले. या विधीदरम्यान, सर्वप्रथम आपट्यांची पाने असलेले झाड  लावून त्याची पूजा करण्यात आली. या पूजेनंतर प्रतिकात्मक बळी देण्यात आला. संस्थानच्या तत्कालीन राजांनी पशूबळी न देता प्रतिकात्मक बळीची ही प्रथा सुरू केली. आजही ती परंपरा जपली जात आहे. बळी दिल्यानंतर लग्न सोहळा पार पडला. पुरोहीतांनी मंगलाष्टक म्हटल्यानंतर उपस्थितांनी, राजघराण्याच्या सदस्यांनी 'सोनं' अर्थात आपट्यांची पानं लुटून विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. राजघराण्यातील सदस्यांना सोनं देत त्यांचे आशीर्वाद घेतले. 

यावेळी यावेळी  डॉ. जी. ए. बुवा, ॲड. शामराव सावंत, एल एम सावंत, मोरेश्वर पोतनीस, बाळासाहेब बोर्डेकर, श्री. गवस आदींसह सावंतवाडीच्या राजघराण्यावर प्रेम करणारे असंख्य नागरिक या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राजवाड्याच्या प्रांगणात उपस्थित होते. दरम्यान, जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी राजवाड्यात भेट देत या शाही सोहळ्यात सहभाग घेतला. राजघराण्याला त्यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.