इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानाचा शाही दसरोत्सव

भाविकांच्या गर्दीचा उच्चांक
Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 25, 2023 19:05 PM
views 179  views

देवगड : सनई चौघड्यांच्या सुरात ढोलताशांच्या गजरात चौऱ्याऐंशी खेड्याचा अधिपती असलेल्या देवगड साळशी येथील ऐतिहासिक वारसा लाभलेला येथील इनामदार श्री देव सिध्देश्वर पावणाई देवस्थानाचा दसरोत्सव मंगळवारी शाही थाटात भाविकांच्या विक्रमी गर्दीत उत्साहात साजरा करण्यात आला.

हा शाही थाटातील दसरोत्सव सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. दसऱ्यादिवशी दुपारी श्री पावणाई देवी मंदिरात इशारत केली गेली. वस्त्रभूषणांनी सजविलेले देवतरंग ( शिवकळा) काढण्यात आले व शिवकळेकडून सीमोल्लंघनाचा हुकूम झाल्यावर ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत ‘हर हर महादेव’च्या घोषात देव तरंगाबरोबर निशाणदार, भालदार, चोपदार, मशालदार, चौरवीदार, अबदागीर, घडशी गोंधळी, देवाचे सेवेकरी अशा लव्याजम्यासह बारा पाच मानकरी, ग्रामस्थ, असंख्य भक्तगण सीमोल्लंघनासाठी आपट्याच्या झाडाकडे रवाना झाले. तेथे आपट्याच्या झाडाची ब्राह्मणाकरवी पुजा करण्यात आली. आणि आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून लुटण्यात आली.

त्यानंतर माघारी येताना चौऱ्याऐंशीच्या चाळ्याला भेट देऊन नंतर श्री गांगेश्वर-विठ्ठलाई देवीला भेट देण्याचा रिवाज आहे. त्यानंतर श्री देव सिद्धेश्वर, श्री पावणाई देवी व श्री रवळनाथ देवालयाभोवती फेरी मारून पाषाणाची भेट घेण्यात आली. त्यानंतर देवता पापडीवर गेल्यावर भक्तगणांनी देवास सोने अर्पण करून कृपाशिर्वाद घेतला.

येथील शाही थाटातील दसरा सोहळा ‘याची देही याची डोळा पाहण्यासाठी व देवदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यादिवशी देवीची ओटी भरण्यासाठी व कृपाशिर्वाद घेण्यासाठी माहेरवाशिणी येतात. तसेच बाहेर गावस्थित ग्रामस्थ, चाकरमानी आवर्जुन येतात. भाविकांच्या अलोट गर्दीत मंदिर परिसर फुलून गेला होता. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्याने मंदिराचा परिसर भक्तीमय झाला होता.