प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रॉक गार्डन समस्याग्रस्त : महेश कांदळगावकर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 16, 2023 19:25 PM
views 106  views

मालवण : रॉक गार्डनच्या जडणघडणीत सर्वच लोकप्रतिनिधींनी आपापल्या काळात प्रयत्न करून अल्पावधीत रॉक गार्डन पर्यटन दृष्ट्या सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रॉक गार्डन समस्याग्रस्त बनले आहे. म्यूझीकलं फाउंटन बंद, गार्डनमध्ये अंधार, लव्ह मालवण अंधारात, प्रवेश फी वसुली बंद आहे. त्यामुळे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी रॉक गार्डनमध्ये सुद्धा एक इव्हेंट करावा जेणेकरून रॉक गार्डनची झालेली दुर्दशा त्यांना पाहता येईल अशी माझी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केली आहे. 

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, मालवण नगरपालिकेच रॉकगार्डन हे दिवसेदिवस पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत. यामुळे मिळणाऱ्या प्रवेश फी पासून परिषदेच्या उत्पन्नातही भर पडत आहे.  असे असताना प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे सध्या रॉक गार्डन मध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गार्डन मध्ये बऱ्याच ठिकाणी काळोखाच  साम्राज्य झाले आहे. ज्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसवली आहे त्या ठिकाणच्या लाईट बंद आहेत. त्यामुळे याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच टॉयलेट मध्ये लाईट नाही. 

 म्युझिकल फाऊन्टन् बंद

रॉक गार्डनच्या सौदंर्यात भर पडावी म्हणून आमच्या कालावधीत सुमारे 95 लाखाचा म्युझिकल फाऊन्टन बसविण्यात आला.  फाऊन्टन बसविल्या नंतर पर्यटकांच्या संख्येतही वाढ झाली. पर्यायाने रॉक गार्डन परिसरातील व्यवसायिकांच्या  व्यवसायात वाढ झाली. नवीन व्यवसायिकही वाढले. परंतु सध्या पर्यटन हंगाम सुरु होवूनही हा म्युझिकल फाऊन्टन बंद आहे. त्यामुळे  पर्यटकांचाही हिरमोड होत आहे. 

लव्ह मालवण काळोखात : 

रॉक गार्डनमध्ये शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करुन आय लव्ह मालवण हा सेल्फी पॉईंट वर्षापूर्वी बसविण्यात आला आहे. रात्रीच्या लाईटमध्ये हा अजून आकर्षक दिसत आहे. येणाऱ्या पर्यटकाला या सेल्फी  पॉईंट सोबत  फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही. त्यामुळे मालवणचे नाव सगळीकडे होत आहे. पण सध्या हा सेल्फी पॉईंट अंधारात आहे.  त्याच्या सर्व फ्लड लाईट बंद आहेत.  

प्रवेश फी वसुली बंद : 

रॉक गार्डनमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती कडून नाममात्र पाच रुपये प्रवेश फी घेण्यात येत होती.  यापासून नगर परिषदेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. पण सध्या प्रवेश फी पण वसूल केली जात नाही. ऑक्टोबर मध्ये सलग सुट्ट्या असल्याने हजारो पर्यटक मालवण मध्ये  येऊन गेले आहेत. प्रवेश फी काऊन्टर बंद असल्याने रॉक गार्डनला भेट दिलेल्या    पर्यटकाकडून मिळणारे प्रवेश फीचे उत्पन्न बुडले आहे याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल कांदळगावकर यांनी उपस्थित केला.