तिलारी घाट मार्गे एसटीसाठी रस्तारोको

Edited by: लवू परब
Published on: October 15, 2024 15:53 PM
views 338  views

दोडामार्ग : तिलारी घाट मार्गे एसटी बस वाहतुक तात्काळ सुरु करावी अशी मागणी करून देखील कोल्हापूर प्रशासन विभाग याकडे कानाडोळा करीत असल्याने मंगळवारी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी तिलारी कोदाळी येथे रास्ता रोको आंदोलन छेडले. मात्र आक्रमक पवित्रा घेतलेल्या आंदोलकांनी प्रांताधिकारी यांच्या आश्वासना अंती आंदोलन मागे घेतले. येत्या दोन दिवसात योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी सकारात्मकता भूमिका गडहिंग्लज प्रांताधिकारी एकनाथ कलबांडे यांनी दर्शविली.  

कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी पावसाळ्यात उद्भवलेल्या अतिवृष्टीमुळे तिलारी घाट मार्गे अवजड वाहनांना बंदी घातली. त्यामुळे एसटी बस ला देखील या मार्गाने वाहतूक करण्यास प्रतिबंध पडला. तेव्हा पासून या मार्गाने धावणारी एसटी बस सेवा बंद आहे. गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेल्या एसटी बस मुळे स्थानिकांचे हाल झाले. शाळा, कॉलेज चे विद्यार्थी, वृध्द व कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांची ससेहोलपट झाली. त्यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन तिलारी घाटातून बस सेवा सुरु करण्याचे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांन दिले होते. परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. म्हणून येथिल स्थानिकांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया समोर उपोषण छेडले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपले शिष्ट मंडळ घाट रस्त्याची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गडहिंग्लज प्रांताधिकारी एकनाथ कलबांडे सोबत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, एसटी महामंडळाचे अधिकारी, आरटिओ विभागाचे अधिकारी यांनी आठ दिवसांपुर्वी प्रात्यक्षिक घेतले होते. मात्र, एसटी बस चालु करण्याच्या दृष्टीने कोणतिही कार्यवाही झाली नाही. प्रशासनाच्या या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. 

मंगळवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास तिलारी घाटाच्या माथ्यावर कोदाळी येथे स्थानिकांनी रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी चंदगड पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. मात्र, महसूल प्रशासन अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलन कर्ते आपल्या भुमिकेवर ठाम राहिले. शेवटी प्रांताधिकारी कार्यालयातुन प्रतिनीधी उपस्थित राहिला. आंदोलन करत्यांची समजुत काढत प्रांताधिकारी निवडणूकीच्या कामात व्यस्त आहेत. त्यांनी आपल्या कार्यालयात भेटण्याची विनंत केली. त्या विनंतीला मान देऊन आंदोलन करत्यांचे प्रतिनीधीनी  गडहिंग्लज येथील कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान येत्या दोन दिवसात फेर अहवाल करून जिल्हाधिकारी यांच्या कडे सादर करणार आहे. त्यामुळे तुर्तास रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यांनी एसटी बस चालू करण्यासाठी दर्शविलेली सकारात्मकतेमुळे रास्ता रोको आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले.