पाडलोस-मडुरा-शेर्ले भागात रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

तीव्र आंदोलन छेडणार | मडुरा उपसरपंच विजय वालावलकर यांचा इशारा
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 18, 2022 17:21 PM
views 165  views

बांदा : पाडलोस-मडुरा-शेर्ले रस्ता खड्ड्यांनी भरला असून रुग्णांना दवाखान्यात नेताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे बुजविण्याच्या मार्गाखाली निधी खर्च होतो परंतु खड्डे काही सुधारत नाहीत. रस्त्यांची परिस्थिती सर्व लोकप्रतिनिधी तसेच नेतेमंडळींना दिसत असून सोयीस्कर डोळ्यावर पट्टी बांधून आपल्या कार्यक्रमाच्या नियोजनात व्यस्त आहेत. त्यामुळे निदान सार्वजनिक बांधकाम विभागाने  याकडे लक्ष देऊन पूर्ण मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी मडुरा उपसरपंच विजय वालावलकर यांनी केली आहे.

बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस-मडुरा-शेर्ले भागात रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी वाहने नादुरुस्त होत असून प्रवाशांच्या आजारातही भर पडत आहे. रुग्णांना तर रुग्णालयात नेईपर्यंत खड्ड्यांमुळे वेदना असह्य होतात. अनेकवेळा मागणी करुनही याकडे दुर्लक्ष होत आहे तर खड्डे बुजवण्याच्या नावाखाली केवळ सर्वसामान्य जनतेचा निधीच वाया जात आहे. नेतेमंडळींना रस्ता दुरूस्तीचे नियोजन करण्यास वेळ नाही का, असा सवाल विजय वालावलकर यांनी केला.

निवेदने, आंदोलने करून प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नाही. रस्त्याची दयनीय अवस्था झाली ही खरी परिस्थिती असताना एवढा वेळ कशाला? त्यामुळे आता अधिकाऱ्यांच्या आश्वासनाला कंटाळलेली जनता वेळ आल्यावर तीव्र आंदोलन छेडणार असून नंतर कोणी मध्यस्थी किंवा मोठेपणासाठी येऊ नये असा इशारा मडुरा उपसरपंच विजय वालावलकर यांनी दिला.