
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षावाल्यांना जिल्हा परवाने दिले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रिक्षावाले जिल्ह्यातील कोणत्याही स्थानकात आपली रिक्षा लावू शकतात व प्रवासी वाहतूक करू शकतात अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय प्रभारी निरीक्षक नंदकिशोर काळे यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी दुसऱ्या तालुक्यातील रिक्षाचालकाने आपली रिक्षा जिल्हा रुग्णालय येथे व्यवसायासाठी उभी केली होती याच कारणावरून रिक्षा व्यावसायिकांमध्ये वादंग ही झाला होता. त्यानंतर रिक्षा व्यावसायिकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी श्री नंदकिशोर काळे यांची भेट घेत याकडे लक्ष वेधले होते.
यावर प्रतिक्रिया देताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री काळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात सद्यस्थितीत नव्या रिक्षा विकत घेणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे, त्यामुळे जिल्हा रिक्षा परवाने मोठ्या प्रमाणात परिवहन विभागाकडून देण्यात आले आहेत. तर हे परवाना जिल्हा परवाने म्हणून दिले जातात, त्यामुळे जिल्ह्यातील कोणतेही व्यक्ती जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी आपली रिक्षा लावू शकतात व प्रवासी वाहतूक करू शकतात असे सांगितले यामुळे रिक्षा चालकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी श्री. नंदकिशोर काळे यांनी दूर केला आहे.