
कुडाळ : महसूल विभागाच्यावतीने 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत असलेल्या 'महसूल सप्ताह' निमित्त आज, 5 ऑगस्ट रोजी कुडाळ तालुक्यातील बिबवणे ग्रामपंचायत येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्यांची डीबीटी (Direct Benefit Transfer) अजून झालेली नाही, त्यांची पोर्टलवर नोंदणी करणे हा होता. यावेळी, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत नवीन मंजूर झालेल्या प्रकरणांमधील पाच लाभार्थ्यांना विभागीय आयुक्तांच्या हस्ते लाभ मंजूरी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यामध्ये वैशाली बिबवणेकर, मालती हरमलकर, भारती भगत, सावित्री गावकर, आणि सुभद्रा घाटकर यांचा समावेश होता.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वीरसिंग वसावे, बिबवणेच्या सरपंच सृष्टी कुडपकर यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने बिबवणे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले.