कर्ली नदीतील अवैध वाळू उत्खननावर 'महसूल'ची मोठी कारवाई

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 09, 2025 17:24 PM
views 602  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कवठी आणि चेंदवण परिसरात कर्ली नदीच्या पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे आणि तहसीलदार विरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

शनिवारी सकाळी ११ वाजता निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, वालावल मंडळ अधिकारी श्वेता दळवी आणि ग्राम महसूल अधिकारी भरत नेरकर, सोनाली मयेकर, स्नेहल सागरे, शिवदास राठोड यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने चेंदवण येथील ६ आणि कवठी येथील २ असे एकूण ८ वाळूचे रॅम्प उद्ध्वस्त केले.

तहसीलदार विरसिंग वसावे यांनी बेकायदा वाळू उत्खनन पूर्णपणे थांबवण्यासाठी परिसरात गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी विशेष पथकही स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांना मोठा धक्का बसला आहे.