निवृत्त सैनिकांचा करण्यात येणार भव्य सन्मान

Edited by: दिपेश परब
Published on: August 12, 2025 19:55 PM
views 175  views

वेंगुर्ला :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा जागर निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्गच्या वतीने ‘ऑपरेशन सिंदूर तिरंगा’ पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. देशभक्तीच्या घोषणा, हातात तिरंगा, आणि निवृत्त सैनिकांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथून सुरू होऊन वेंगुर्ला तहसील कार्यालय येथे समारोप होणार आहे.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील निवृत्त सैनिकांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा पुढे नेणाऱ्या आणि देशाच्या सीमेवर आपले प्राण पणाला लावणाऱ्या या वीरांना अभिवादन करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. “देशाच्या सुरक्षिततेसाठी केलेले त्यांचे योगदान अमूल्य आहे, आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा सोहळा आहे,” असे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.

पदयात्रेत खर्डेकर महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्स, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते तसेच वेंगुर्ला शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. 

 ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत या पदयात्रेचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. प्रत्येक नागरिकाच्या घरावर तिरंगा फडकवण्याच्या उद्दिष्टाने आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी केले आहे.