
देवगड : सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर सदाशिव भगत, वय ६२ रा.जामसंडे टिळकनगर या बुधवारी रात्री ८ वा. दुःखद निधन झाले. अल्पशा आजाराने बेळगाव येथील मूळ निवासस्थानी निधन झाले.
देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई संचलित देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूल व वाडा येथील अ. कृ. केळकर हायस्कूल येथे त्यांनी मुख्याध्यापक पदाची यशस्वी धुरा सांभाळली होती. पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. मनोहर भगत हे १९८६ साली देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूल येथे शिक्षक सेवेत रुजू झाले होते. गणित व विज्ञान विषयाचे ते शिक्षक होते. या दोन्ही विषयात त्यांचा हातखंडा होता. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. शिक्षक पदावरून मुख्याध्यापक पदावर बढती मिळाल्यानंतर त्यांनी देवगड हायस्कूल व वाडा हायस्कूल येथे एकूण नऊ वर्षे मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली होती. वाडा हायस्कूल येथूनच ते सेवानिवृत्त झाले. वाडा हायस्कूलचे ते माजी विद्यार्थीही होते.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ या शिक्षक संघटनेचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांची मोठी मुलगी मौसमी भगत ही बेळगाव येथे वकिली व्यवसाय करीत असून अन्य दोन मुली शिक्षण घेत आहेत. ॲड. मौसमी हिचा ८ जून रोजी बेळगाव येथे विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुलीच्या लग्नापूर्वीच त्यांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लग्न समारंभा निमित्त ते त्यांच्या मूळ गावी बेळगाव येथे गेले होते.