
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जे प्राथमिक शिक्षक नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना आजपर्यंत सेवानिवृत्तीनंतरचे लाभ प्रदान करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या मागणीसाठी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक चंद्रकांत अणावकर, नंदकुमार राणे व सहका-यांनी आज सकाळी कुडाळ पंचायत समिती समोर आंदोलन केले.
जि.प.च्या वित्त विभागाने ११ मार्च २०२५ पर्यंत अनेकवेळा लेखी सूचना देऊन, नियत वयोमानाने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी व शिक्षक यांचे पेन्शन प्रस्ताव ०६ अहिने अगोदर तयार करून मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी सादर करावेत असे सर्व गटशिक्षण अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत. परंतु गटशिक्षण अधिकारी कुडाळ यांनी वित्त विभाग जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या लेखी आदेशाकडे आजपर्यंत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कोणत्याही सेवानिवृत्त शिक्षकाचे प्रस्ताव ०६ महिने अगोदर जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेले नाहीत. संबंधित टेबल क्लार्क सेवाजेष्ठता विचारात न घेता मर्जीतील काही शिक्षकांचे प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी अगोदर पाठवतो. आणि इतरांचे प्रस्ताव शिक्षक ज्या महिन्यात निवृत्त होतो त्या महिन्यात प्रस्ताव पाठवले जातात. त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना पेन्शन चे लाभ वेळेवर मिळत नाहीत.
याबाबतीत अधिक माहिती घेतली असता सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकाना कार्यालयात बोलावून आवश्यक त्या पूर्तता करून घेतल्या जातात आणि त्याला अमुक अमुक झिरो कर्मचाऱ्याला भेटून तुमचे पेन्शन प्रस्ताव करून घ्या असे सांगितले जाते. संबंधित कर्मचाऱ्याला जर पेन्शन प्रस्ताव तयार करता येत नसतील तर त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे किंवा ज्या झिरो कर्मचाऱ्याकडून पेन्शन प्रस्ताव तयार करून घेतले जातात त्याचा मेहनताना संबंधित टेबल क्लार्कने दयावा. पेन्शन प्रस्ताव तयार करून घेण्याचा भुर्दंड संबंधित शिक्षकावर लादू नये. कुडाळ तालुक्यात असेही काही सेवानिवृत्त शिक्षक आहेत जे ३१ डिसेंबर २०२४ नंतर सेवानिवृत्त झाले त्यांना ग्रच्युयिटी, अंशराशीकरण आणि गटविमा याचे लाभ अद्याप मिळालेले नाहीत. सेवानिवृत्तीनंतरचे लाभ अतिविलंबाने मिळण्यास कुडाळ गटशिक्षण कार्यालय जबाबदार आहे. या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या नियमबाह्य व गलथान कारभाराची नोंद घेण्यात यावी. ३० जून २०२५ पर्यंत कुडाळ तालुक्यातील जे सेवानिवृत्त शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे सर्व लाभ त्यांना मंजूर व्हावेत, यासाठी हे आदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.