
दोडामार्ग : शाळांमध्ये वर्गात विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचे वाढदिवस साजरे करणे बंद करण्यात यावे असा आदेश अनुदानित / विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) सिंधुदुर्ग यांनी काढला आहे. त्यामुळे यापुढे शाळेत वाढदिवस साजरे करण्यावर आता निर्बंध आले आहेत. याबाबतची घोटगेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल कर्पे यांनी मागणी केली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच शाळांमध्ये माध्यनिक, उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांचे वर्गात वाढदिवस साजरे करणे ही नवी पद्धत उदयास येत आहे. वाढदिवशी विद्यार्थ्यांकडून वर्गणी गोळा करून महागडे केक, वर्ग सजावटीचे सामान, फोम स्प्रे व गिफ्ट आणले जातात. ग्रामिण भागातील पालकांची सर्वांचीच आर्थिक परीस्थिती सारखी नसल्याने मुलांना शिक्षकांचे वाढदिवस साजरे करताना पैशांसाठी पालकांकडे मागणी करावी लागते. यास्तव शालेय शैक्षणिक वातावरण बिघडून पालकांवर व मुलांवर आर्थिक व मानसिक ताण निर्माण होतो. त्यामुळे अशा चाललेल्या शिक्षण क्षेत्रातील विघातक प्रथांना तात्काळ थांबविण्याच्या सूचना शाळांना द्याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अतुल कर्पे यांनी केली होती.
अतुल कर्पे यांच्या मागणीनुसार शिक्षकांचे शाळेत वाढदिवस साजरे करणे ही खाजगी बाब असल्याकारणाने शाळांमधील शैक्षणिक वातावरणाशी निगडीत सर्व शासकीय नियमांचे व सूचनांचे पालन करणेत यावे. तसेच शालेय शैक्षणिक कामकाजात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणेत यावी व शाळेत यापुढे शिक्षकांनी वाढदिवस साजरे करू नयेत असे पत्रच सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी जिल्ह्यातील अनुदानित / विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना काढले आहे.