भारत - पाक युद्धातील शहीद जवान लक्ष्मण गवस यांना तेरवणवासीयांची मानवंदना

Edited by: संदीप देसाई
Published on: August 17, 2023 19:52 PM
views 116  views

दोडामार्ग : देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माझी माती माझा देश या केंद्र सरकारच्या अभियाना अंतर्गत १५ ऑगस्टला तेरवण गावात जि.प. शाळा तेरवण नंबर १ येथे ध्वजारोहण व विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर १९७१ च्या भारत पाक युद्धात शहीद झालेले गावचे सुपुत्र शहीद जवान लक्ष्मण गोपाळ गवस यांचे तेरवण गावात उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या ठिकाणी शहीद जवानाला त्यांच्या पुतळ्यासमोर दीप प्रज्वलित आणि पूजा अर्चा व पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी वीरपत्नी भागीरथी लक्ष्मण गवस, शालेय शिक्षक व विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   

ही खंत कायम..

लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाचे लोकार्पण मे २०२३ ला झाले. गावातील व पंचक्रोशीतील अनेक आजी-माजी सैनिक मिळून ६०० जण या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तालुक्यातून अनेक पत्रकारही आले होते. मात्र पालकमंत्री, स्थानिक खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देऊन सुद्धा हे लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी  या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याची खंत ग्रामस्थ आजही व्यक्त करत आहेत.