
वेंगुर्ला : शंभरहून अधिक वर्षाचे केवळ पावसाळी पाण्याचा निचरा होणारे पूर्वपार मार्ग कायमस्वरूपी पूर्ववत खुले करून मिळणेबाबत शिरोडा बाजारपेठ एथिक कापाना गल्लीच्या रहिवाश्यांनी शालेय शिक्षण मंत्री यांची भेट घेत या प्रश्नी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी मंत्री केसरकर यांना निवेदन देत हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली.
या निवेदनात येथील रहिवाशांनी म्हटले आहे की, शिरोडा बाजारपेठ येथील कापांना गल्लीच्या शेजारच्या जमीन मालकांनी शिरोडा बाजारपेठेतील १६ दुकाने आणि ९ घरांचे पावसाळी पाण्याचा निचरा होणारे शेकडो वर्ष जुने असलेले अनेक पारंपरिक मार्ग या वर्षी बंद केल्याने कापांना गल्लीत आणि परिसरात पावसाचे पाणी साचून आम्हा ग्रामस्थांच्या जीविताला आणि इमारतींना धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात संदर्भात १० जुलै २०२४ रोजी आम्ही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन सादर केले होते.
या अनुषंगाने शिरोडा ग्रामपंचायतला जिल्हाधिकारी यांनी त्वरित कारवाई करण्याच्या दृष्टीने आदेश दिले होते. त्यानुसार वेंगुर्ला तहसीलदार व अन्य प्रशासकीय अधिकारी यांनी या आदेशाचा मान देऊन घटनास्थळी तत्परतेने पाहणी करून शिरोडा ग्रामपंचायतला योग्य ती कारवाई करण्याबाबत आम्हा ग्रामस्थांसमोर समजावून सांगितले होते. त्याप्रमाणे त्वरित कारवाई होऊन आम्हा ग्रामस्थांची ही अतिगंभीर अडचण कायमस्वरूपी सुटणार असे आम्हाला वाटले होते. मात्र आपणास सांगण्यात खेद वाटत आहे की, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्हा कापांना गल्लीतील सर्व रहिवाशांची अडचण समजून घेऊन तत्परतेने कृती करण्याच्या निर्णय देऊनही स्थानिक गटविकास अधिकारी, ग्रामपंचायतने मात्र एवढा मोठा कालावधी उलटूनही, तातडीच्या आदेशाचं परिपूर्ण पालन केलेले नाही, ज्यामुळे आधीच साचून राहिलेले पावसाळी पाणी आणि त्यात आता मिसळलेले सांडपाणी यांमुळे अगोदरपासूनची आरोग्य विषयक समस्या अतीगंभीर झालेली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशाची परिपूर्ण अंमलबजावणी न करता शिरोडा ग्रामपंचायत ने केवळ प्रशासनाचा अपमान केलेला आहे. शिरोडा ग्रामपंचायतला याबाबत विचारणारे कुणी नाही का? असा गंभीर प्रश्न आम्हा सर्व ग्रामस्थांसमोर उपस्थित झालेला आहे.
तसेच ग्रामपंचायत शिरोडाने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, वेंगुर्ला तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना दिशाभूल करणारा कारवाई पूर्ण झाल्याचा खोटा अहवाल सादर करून प्रशासन आणि ग्रामस्थ यांची घोर फसवणूक केलेली आहे, असा आरोप या निवेदनातून ग्रामस्थांनी करत शिरोडा ग्रामपंचायतवर त्वरित योग्य ती कारवाई व्हावी. आमच्या येथील शंभरहून अधिक वर्षाचे केवळ पावसाळी पाण्याचा निचरा होणारे सर्व पूर्वपार मार्ग कायमस्वरूपी पुर्ववत खुले करण्याची मागणी केली आहे. यावेळी कापाना गल्लीतील राहिवासी जेष्ठ पत्रकार अनिल निखार्गे, शिवसेना महिला पदाधिकारी शीतल साळगावकर, सच्चीत निखार्गे यांच्यासहित कापाना गल्लीतील रहिवासी उपस्थित होते.