आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये सावंतवाडीच्या हृषीकेश पाटीलचा शोध निबंध मांडला जाणार

हवामान बदला बाबत दुबई इथं होणार कॉन्फरन्स
Edited by: भगवान शेलटे
Published on: November 27, 2023 20:23 PM
views 102  views

सावंतवाडी : दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवामान बदला बाबतच्या कॉन्फरन्समध्ये सावंतवाडीच्या अॅडव्होकेट हृषीकेश पाटील यांनी लिहिलेला शोध निबंध मांडला जाणार आहे. 

यावर्षी  नोव्हेंबर ३० ते डिसेंबर १२  या दरम्यान दुबई येथे कॉन्फरन्स ऑफ पार्टी  म्हणजे  कॉप २८  ही  क्लायमेट चेंजचा सामना करण्यासाठी सर्व देशांनी एकत्रित येऊन  घेतली जाणारी आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे.  क्लाइमेट चेंजचा  एकत्रित सामना कसा करावा याविषयी चर्चा आणि महत्त्वाचे निर्णय  या परिषदेत घेतले जातात.   

ही परिषद दरवर्षी  जगातल्या वेगवेगळ्या देशात घेतली जाते.  आंतरराष्ट्रीय स्तरावर हवामान बदलाचा सामना करण्यासाठी गठित केलेली ही एकमेव परिषद आहे.  ज्यात  जगातले  जवळपास सर्व देश समाविष्ट आहेत.  यावर्षी हि परिषद दुबई येथे होत असून,  ७००० हून जास्त  डेलिगेट्स  या परिषदेला  उपस्थित राहणार आहेत.  यामध्ये  शास्त्रज्ञ,  सर्व देशांचे  प्रतिनिधी  जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी,  मानवाधिकार कार्यकर्ते,  विधीतज्ञ,  धोरण तज्ञ,  समाविष्ट आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यावर्षीच्या परिषदेला  उपस्थित राहणार आहेत.

सावंतवाडीचे अॅडव्होकेट , पर्यावरणवादी कार्यकर्ते, पत्रकार  ऋषिकेश पाटील  आणि  दिल्लीतील पत्रकार सेजल पटेल  यांनी लिहिलेला  शोध निबंध  यावर्षीच्या परिषदेत मांडला जाणार आहे.  आपल्या देशाची राजधानी दिल्ली वर होणारा  क्लायमेट चेंजचा परिणाम  यावर आधारित  हा शोध निबंध  या दोन पत्रकारांनी लिहिला  होता.   

अॅड.  ऋषिकेश पाटील यांना  यावर्षी  क्लायमेट ॲक्शन नेटवर्क  साऊथ एशिया  आणि क्वेश्चन ऑफ सिटीज  या दोन संस्थांद्वारे  हवामान बदलाच्या  संदर्भात  पत्रकारितेसाठी  दिली जाणारी  फेलोशिप मिळाली होती.  दक्षिण आशियातील  देशांमधल्या  पत्रकारांना  ही फेलोशिप दिली जाते.  भारतातून  अॅड. ऋषिकेश पाटील, सेजल पटेल , बराशा दास  आणि हरीश बोराह या चौघांना  ही फेलोशिप मिळाली. यावर्षी जून महिन्यात मिळाली होती. यासोबत  बांगलादेश,  नेपाळ, आणि पाकिस्तानमधील  पत्रकारांना  ही फेलोशिप  दिली गेली. 

अॅड ऋषिकेश पाटील  आणि सेजल पटेल  यांनी आपल्या शोध निबंधातुन दिल्लीतल्या सामान्य लोकांवर    उष्णतेच्या लाटेचा  कसा परिणाम होतो  यावर लेख  लिहिला आहे.  जो यावर्षी  दुबई येथील परिषदेत मांडला जाणार आहे.  या लेखांच्या आधारे धोरण आखणेचे पुर्वी  जनतेचे ,  लोकांचे प्रश्न समजण्यास  मदत होणार आहे.