
कणकवली : कणकवली तालुक्यातील कासारडे गावासह अन्य आजूबाजूच्या गावांमध्ये खाणपट्टा / तात्पुरते परवाने मंजूर केलेल्या ठिकाणी अथवा अन्य जागेत विनापरवाना उत्खनन झालेल्या सर्व क्षेत्रांच्या सद्यस्थितीवर मागील तीन वर्षांच्या गुगल इमेजचा वापर करून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. याबाबत वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद यांनी कासार्डे भागात पाहणी करून शासनाकडे करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हे आदेश देण्यात आले असल्याची माहिती माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.
शासनाकडून सर्व तहसीलदारांना कळविण्यात आले आहे की, आपल्या अधिनस्त ज्या क्षेत्रात खाणपट्टा अथवा तात्पुरते परवाने मंजूर करण्यात आले आहेत, अथवा याव्यतिरिक्त अन्य जागेत विनापरवाना गौण खनिज उत्खनन केल्याचे निदर्शनास आलेले आहे किंवा तक्रार प्राप्त झाली आहे. अशा सर्व क्षेत्रांचे आवश्यक असल्यास MRSAC यांची मदत घेऊन २०१७ व २०२२ मधील त्यांच्याकडील उपलब्ध हाय रेझोल्युशन सॅटेलाईट इमेजचा व उददुत Earth वरील चालू ईमेजचा तौलनिक अभ्यास करून उत्खननासाठी परवानगी दिलेल्या क्षेत्रामध्येच उत्खनन करण्यात आलेले आहे किंवा कसे, याबाबतची शहानिशा करावी.
तसेच, उत्खनन झालेल्या क्षेत्राचे ड्रोनद्वारे अथवा ईटीएसद्वारे मोजमाप करून आढळून आलेली तफावत आणि गौण खनिज उत्खननास देण्यात आलेले परवाने यांचा ताळमेळ घालून परवानगीपेक्षा जास्त अवैध उत्खनन झाल्याचे निर्दशनास आल्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ व महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन), नियम २०१३ मधील तरतुदीनुसार संबंधिताविरुद्ध १५ दिवसांच्या आत दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.
कासार्डे परिसरात पाहणी केल्यानंतर स्टॅलिन दयानंद यांनी कासार्डे येथे परवानगी असलेले खाण भाडेपट्टा क्षेत्र ५३.७५ हेक्टर आहे, आणि येथे खाणकाम अनेक दशकांपासून सुरू आहे. आवश्यक परवानगी नसतानाही सिलिका खाणकाम सुरू असल्याचे दाखविणारे पुरेसे पुरावे आहेत. ५३ हेक्टरपेक्षा जवळजवळ ९७ हेक्टर जास्त उत्खनन झाले आहे. या ठिकाणी केलेल्या कामांमध्ये खड्यांमधील पाणी बाहेर काढून जवळच्या नैसर्गिक नदीच्या प्रवाहात सोडणे समाविष्ट आहे. आमच्याकडे त्याचे पुरावेही आहेत. धुलाई उघड्यावर केली जाते आणि अवशेष जवळच्या शेतात गेले आहेत. या कामांमध्ये बेकायदेशीर कृत्ये आहेत. आम्ही मोठ्या मुद्द्यावर आहोत, की ईसी नसतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि बेकायदेशीर कामे सुरू असताना परवानगी कशा दिल्या जात होत्या आणि कामांना परवानगी कशी दिली जात होती? या निष्क्रियतेमुळे प्रोत्साहित होऊन, अशी अनेक लहान उत्खनन स्थळे साइटपासून ५ किमी त्रिज्येत वाढली आहेत.
साईटवरील संपलेल्या खाण क्षेत्रात बॅकफिलिंग कुठे केले जात आहे? उपग्रह प्रतिमा तपासण्यासारखे मूलभूत काम ५ मिनिटे खर्च करून का केले गेले नाही? येथे होणाऱ्या प्रचंड पर्यावरणीय ऱ्हासाला कोणाला जबाबदार धरावे ? कणकवलीमध्ये या क्षेत्रात कोणतेही नियंत्रण किंवा संतुलन नाही आणि जंगली भागात अनेक ठिकाणी रॉक क्रशर दिसतात. अशा ठिकाणी तात्काळ साइटला भेट देऊन सर्व कामे बंद करण्याचे, दंड आकारण्याची मागणी स्टॅलिन दयानंद यांनी केली असल्याचे उपरकर यांनी सांगितले आहे










